ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

१७ जून रोजी मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा – १००% खाजगीकरणाच्या विरोधात

मुंबई महानगरपालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत साफसफाई आणि परिवहन खात्यातील कामे ‘एरिया बेस’च्या नावाखाली ठेकेदारामार्फत करून घेण्यासाठी म.न.पा. प्रशासनाने दि. १४-०५-२०२५ रोजी टेंडर काढलेले आहे. याबाबत विविध संघटनांनी आपआपल्या संघटनेच्यावतीने पत्र लिहून सदर टेंडरला विरोध केलेला आहे. म.न.पा. प्रशासनाकडून त्या अनुषंगाने कोणताही प्रतिसाद लाभलेला नाही. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ, दि म्युनिसिपल युनियन, कचरा वाहतुक श्रमिक संघ, म्युनिसिपल मजदूर संघ आणि महापालिकेतील कामगार संघटना यांनी एकत्र येऊन दि. ५ जून २०२५ रोजी ‘म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समिती’ची स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून महापालिकेतील सफाई, परिवहन, रुग्णालये आणि इतर खात्यातील कायम कामगार आणि कंत्राटी कामगारांचा खाजगीकरणाचा (वेटलिज) समितीच्या वतीने विरोध करण्यात येत आहे.  

  मुंबई महानगरपालिकेच्या  १००% खाजगीकरणाच्या विरोधात प्रशासनाला गंभीर इशारा देण्यासाठी मंगळवार दि. १७ जून २०२५ रोजी मुंबई महानगरपालिकेतील सफाई, परिवहन, रुग्णालये आणि इतर खात्यातील सर्व कायम कामगार आणि सध्या कार्यरत असलेले कंत्राटी कामगार आझाद मैदान येथे मोर्चाने येऊन महापालिकेला त्यांचे निवेदन सादर करणार आहेत. तसेच याबाबतीत महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद न लाभल्यास त्याच मोर्चामध्ये तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये महापालिकेच्या सर्व विभागातून कायम कामगार व सध्या कार्यरत असलेले कंत्राटी कामगार हजारोंच्या संख्येने सहभागी होतील असा अंदाज आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वर्तवण्यात आला. यावेळी अशोक जाधव (अध्यक्ष – म्युनिसिपल मजदूर युनियन), शशांक राव (अध्यक्ष – दि म्युनिसिपल युनियन), प्रकाश जाधव (सरचिटणीस – म्युनिसिपल मजदूर संघ),  वामन कविस्कर (निमंत्रक म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समिती), बाबा कदम (अध्यक्ष – म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना), शेषराव राठोड (कार्याध्यक्ष – मुंबई म्युनिसिपल कामगार संघ), मिलिंद रानडे (सरचिटणीस – कचरा वाहतुक श्रमिक संघ) यांच्यासह  विविध संघटनातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

error: Content is protected !!