संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवर हल्ला मराठा क्रांती मोर्चा मैदानात
सोलापूर/अक्कलकोट (सोलापूर) येथे रविवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकून धक्कादायक हल्ला करण्यात आला. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असताना त्यांच्या गाडीसमोर काही लोकांनी आक्रमकपणे शाई फेकली आणि त्यांना खाली खेचून धक्काबुक्की केली. या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. दीपक काटे (भाजप युवा मोर्चा राज्य सचिव), किरण साळुंखे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह सात जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पाच आरोपी फरार आहेत.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक आणि हल्याचा मराठा क्रांती मोर्चाकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. प्रवीण गायकवाड हे कुटुंबासहित असताना अशा पद्धतीने भ्याड हल्ला करणे हे अत्यंत निषेधार्ह असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दिलीप भाऊ कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, संविधानाने प्रत्येकाला आंदोलन मोर्चा करण्याचा अधिकार पण अशा पद्धतीने हल्ला हे भ्याड कृत्य आहे. मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.
हल्ल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट
या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सुप्रिया सुळे, प्रकाश आंबेडकर, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रवीणदादांना त्वरित फोन करून परिस्थितीची चौकशी केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर येथे गायकवाड यांचा दुग्धाभिषेक करत जोरदार स्वागत केले. या घटनेमुळे मराठा समाजात अस्वस्थता पसरली असून राजकीय वातावरणही तापले आहे