जम्मू काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचे एन्काऊंटर- पहेलगावच्या दहशतवाद्यांवर २० लाखांचे इनाम
श्रीनगर/ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले तर कठोर कारवाई करू असा पंतप्रधान मोदींनी इशारा दिल्यानंतरही ,पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून सीमेवर गोळीबार सुरूच आहे. आज जम्मू-काश्मीरमधील सोफिया भागात दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा दलाची चकमक झाली. यात तीन दहशतवादी मारले गेले. तर ऑपरेशन सिंदूर कायमचे थांबवलेले नसून, केवळ स्थगित करण्यात आले आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पाकिस्तान वर कठोर शब्दात टीका केली होती. तसेच भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर किती प्रभावीपणे राबवले आणि दहशतवाद्यांचा कसा खात्मा केला हे सांगितले होते. मात्र हे सांगताना ऑपरेशन सिंदूर केवळ स्थगित केले आहे बंद केलेले नाही .त्यामुळे भविष्यात जर दहशतवादी हल्ले झाले तर त्यांना दया मया न दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा इशारा दिला होता. पंतप्रधान मोदी यांच्या या इशाऱ्यानंतर काही तासातच सोफिया परिसरात दहशतवादी सक्रिय झाले. त्यानंतर लष्कराने या संपूर्ण परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले याचाच अर्थ पाकिस्तानकडून दहशतवाद थांबलेला नाही. आणि थांबवला जाणार ही नाही. अशावेळी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान बाबत अंतिम निर्णय घ्यावा अशी मागणी भारतीय जनतेकडून होत आहे.
जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, या घटनेत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. शोपियनमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, मिळालेल्या माहितीनुसार सैन्यानं दहशतवाद्यांना घेराव घातला, यावेळी झालेल्या चकमकीत काही मिनिटांमध्येच एक दहशतवादी ठार झाला. तर त्यानंतर दोन तास सुरू असलेल्या चकमकीमध्ये आणखी दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे.
पहेलगाव हल्ल्यातील अतिरेक्यांवर वीस लाखांचे इनाम
22 एप्रिल रोजी पहेलगाव मध्ये पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांवर टी आर एफ च्या दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून गोळीबार केला होता .या गोळीबारात २७ पर्यटक आणि एक स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. हा हल्ला करणारे पाच ते सहा दहशतवादी अजूनही सापडलेले नाहीत. त्यांचा संपूर्ण जम्मू काश्मीर आणि आसपासच्या राज्यांमध्ये शोध घेतला जात आहे त्यांची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.त्यामुळे आता या फरारी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी वीस लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे .जो कोणी या दहशतवाद्यांची माहिती देईल त्याची ओळख गुप्त ठेवली जाईल. असेही जाहीर करण्यात आले आहे.
