डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांची जागा हडप करून भूमाफियांनी बांधली बेकायदेशीर इमारत
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५बेकायदा इमारतींचा मुद्दा ऐरणीवर असतानाच भूमाफियांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. डोंबिवली जवळील दावडी परिसरात भूमाफियांनी चक्क घटनेचे शिल्पकार डॉ. पाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर अतिक्रमण करत टोलेजंग इमारत उभारली आहे.
कल्याण डोंबिवलीमधील बेकायदा बांधकामांचा प्रश्न जटिल आहे. भूमाफियांनी पालिकेचे बनावट कागदपत्रे बनवून रेरा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहेत. रेरा घोटाळ्यातील 65 बेकायदा बांधकामांचा प्रकरणी वास्तुविशारद संदीप पाटील यांनी जनहित याचिका दाखल केल्यावर ही बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. भूमाफियांनी शहरातील मोकळ्या जागांवर तर कब्जा केला आहेच, शिवाय पालिकेच्या आरक्षणाच्या जमिनीवर देखील टोलेजंग इमारती बांधण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.असेच एक प्रकरण डोंबिवलीमध्ये उघडकीस आले आहे. डोंबिवली जवळील कल्याण शीळमार्गालगत दावडी येथील सेंट जॉन शाळेसमोरील भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी सात मजली इमारत उभी केली आहे. या जमिनीच्या सात बारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांच्यासह आणखी दोन नावे आहेत. दरम्यान, आपल्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात येताच आनंदराज आंबेडकर यांनी संबधित भूमाफियाला जाब विचारत याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देत याप्रकरणी मदत करण्याची मागणी केली होती
