साताऱ्यातील यशवंत सहकारी बँकेत ११२ कोटींचा घोटाळा भाजपा नेता अडचणीत
सातारा/यशवंत को-ऑपरेटीव्ह बॅंकेच्या लेखापरिक्षणात बोगस कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी यशवंत बॅंकेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, कराड शाखेतील कर्ज विभागाचे शाखा व्यवस्थापक आणि शेखर चरेगावकरांच्या नातेवाईकांविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यशवंत को-ऑप. बँक लि.कराड या बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ५ अधिकारी, संचालक मंडळ आणि तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे ९नातेवाईक, अशा ५०जणांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान करुन संगनमताने ११२ कोटी 10 लाख ५७ हजार ४८१ रूपयांचा अपहार केला आहे. बोगस कर्ज प्रकरणासाठी बनावट कागदपत्रे तयार करून तारण न घेता हेतुपुरस्सर कर्ज वितरण केले. जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नवीन खाती उघडून निधीचा उद्देशबाह्य विनियोग करून अन्यत्र निधी वळवला. तसेच दस्तावेजात फेरफार व खोट्या नोंदी केल्या. पदाचा गैर वापर करून बँकेच्या ठेवीदार व संभासदांच्या हितास बाधा निर्माण केली आहे.
लेखापाल मंदार देशपांडे यांच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६१, ३१६(2),३१६(४), ३१८ (४), ३३६ (३), ३३८, ३३९,३४० (2),३(५) प्रमाणे बॅंकेच्या तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्षांसह एकूण ५० जणांवर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या दरम्यान यशवंत को-ऑप बँक लि. कराड याठिकाणी हा गुन्हा घडला असल्याचंही फिर्यादीत म्हटले आहे.
