[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अरेरे, छे छे…काय बोलू आता ? कसं समजावू ?

वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग

मध्यंतरी माझ्या जवळच्या एका वैद्यमित्राचा एन्जीयोग्राफी आणि लगेचच एन्जीयोप्लास्टी केल्याचा मेसेज एका कौटुंबिक गटात वाचला. आणि उत्स्फूर्तपणे ~तोंडातून,~ बोटातून टाईप झाले…
“अरेरे, छे छे, काय बोलू आता, कसं समजावू ?” (हा हन्त हन्त…. स्टाईल)

हे तर अगदी काॅमन झाले आहे.
बाजारात जाऊन पिकलेला फणस फोडून गरे आणि आठळ्या त्याच्याकडूनच सुटी करून आणल्याएवढं काॅमन…

नंतर एका भाच्याचा उत्स्फूर्तपणे फोन आला..
” मामा, तुझ्या दोन शब्दातच तुला काय सांगायचंय ते मी समजलो !
आता जरा उचकटून सांग, म्हणजे पुढच्यास ठेच लागल्यावर माझ्यासारखा मागाहून येणारा जरा तरी श्याणा होईल.
तुला सांगतो मामा, हल्ली सगळ्या मोठ्या कंपन्यातून फ्री मेडीकल चेक अप कॅम्पचं फ्यॅड आलं आहे. लोकं लाईनीत उभं र्‍हाऊन रक्त तपासून घेत्यात.”

दि.7 ऑगस्ट 2025

मी म्हटलं,
“अशा सुशिक्षित लोकांनाच जास्ती टार्गेट केलं जातं. ज्याचा बॅक बॅलन्स चांगला आहे, त्यांना मृत्युची भीती घालून आणि ज्यांचा बॅलन्स कमी असतो, त्यांना इन्शुरन्स कंपन्या “आपको गोद मे लेते है” असे सांगून, एखाद्या साध्या ए4 च्या कागदावर प्रिंट काढलेल्या अर्धवट ह्रदयाच्या चित्रात लाल अथवा निळ्या पेनाने ‘अंदाजे’ दोन तीन ब्लाॅक रंगवून, भविष्यातील मृत्युची भीती सतत जागृत केली जातेय. हृदयाचे अर्धवट चित्र असलेली साध्या बॅलपेनने रंगवलेल्या ह्रदयाची झेराॅक्स बघताना, हा कागद पुढे पाच ते सात लाखाला फोडणीला घालणार आहे, हे लक्षातच येत नाही. दोन तीन विदेशी स्टेंटसची ह्रदयासाठी मागणी करणारे हे तथाकथित ऑपरेशन केले नाही तर भविष्यात काय होईल, याचा आंखो देखा हाल रुग्णाला, त्याच्या पार्टनरला, मुलांना असा काही सांगितला जातो, की पुढील अर्ध्या तासात पेशंट स्वर्गस्थ होणार आहे, असे चित्र डोळ्यासमोर उभे केले जाते. विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रात हे फारच चालते. सुपर स्पेशालीटी, मल्टीनॅशनल, मल्टीटास्किंग, मल्टीलेयर, अशा मल्टीच्या पटीत उभी असलेली सुसज्ज रुग्णालये, त्यांचे पब्लिक रिलेशन ऑफीसर, दरमहाची टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी ~ठेवलेले पगारी लाचार~ डाॅक्टर आपली सर्व नीतीमत्ता, सभ्यता, मानवता बासनात गुंडाळून ठेवत आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडत असतात.
उंदराला मांजर साक्ष राहात, इतर प्रायव्हेट लिमिटेड वैद्यकिय रुग्णालये देखील हो ला हो करतात, असे बघण्यात येते. कट प्रॅक्टिस विषयी न बोललेलेच बरे ! इथे प्रत्येकाचे हात दगडाखाली अडकलेले. काय बोलणार? कोण बोलणार? का बोलणार ? कसं बोलणार? कशाला बोलणार ? किती वेळा बोलणार? हे अनुत्तरीत प्रश्न रहातात.
समजा जर असं केलं नाहीतर काहीही होऊ शकते, नंतर टाहो फोडून रडलं तरी गेलेला जीव काही परत येणार नाही, हे गुळगुळीत झालेलं वाक्य परत परत ऐकवलं जातं आणि इमोशनल ब्लॅकमेलिंग वर ऑपरेशन करण्यासाठी अर्ध्या तासात शिक्कामोर्तब केलं जातं. त्यावेळेस वापरलेल्या शब्दांचं असं काही गारूड विशेषतः महिला भगिनी वर्गावर पडतं, की आपली सत् सत् विवेक बुद्धी वगैरे योगमायेत झोपी जाते आणि आपण पुढील चार तासात आयसीसीयुत कधी दाखल होतो हे कळतच नाही. इतर जनांना हे लक्षात आलेलं असतं, पण मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची, बोलून वाईटपणा कुणी घ्यायचा, म्हणून इतरेजन मौन सेवन करतात.
या वैद्यकिय अंधश्रद्धेपोटी आणि भीती तसेच अज्ञानापोटी एक जीव दररोज चौदा बावीस गोळ्या खात रहातो. जीवनातला सर्व आनंद हरवून इतरांच्या भरलेल्या ताटाकडे बघत, सुक्या भाकर्‍यांचे तुकडे डाळीच्या पाण्यात बुडवून, मोजून बत्तीस वेळेस चघळत रहातो.
पहिली पन्नास वर्ष मिळत नसतं, म्हणून खाता येत नाही आणि नंतरच्या पन्नास वर्षात, मिळू शकतं तरी, डाॅक्टर सांगतात म्हणून खाता येत नाही. मग निराशा, मत्सर, द्वेष, चिडचिड, यांचा जन्म होतो. यातूनच पुढे अन्य काही व्याधी वाट बघत असतातच.
बरं जे डाॅक्टर असा पैसा मिळवून खूप सुखात असतात, असेही नसते हं. त्यांना त्यांच्या पुस्तकी ज्ञानाचा मद असा काही चढतो की पापपुण्य, विवेकबुद्धी, कर्माचा सिद्धांत वगैरे सर्व गुंडाळून ठेवत पापाच्या राशी वाढवून स्वतःही अनेक औषधे खात बसतात.
त्यापेक्षा आमचो मालवणी कोकणी माणूस बरो, तो हुनतां,
” पाच धा वर्षा आयुक्ष, हकडे तकडे झाला तरी चलात, मराचा तर एक दिस सगळ्याकनी आसा ! गुळ्ये वषेधा खावन् मरण्यापेक्षा जेवन् खावन् प्विऊन मेल्ललां काय वायट ?”
बरं, ह्रदय हा असा मजबूत अवयव आहे, ज्याला ‘एटॅक’ नावाचा रोग होणारच नाही, अशी व्यवस्था ‘त्याने’ अगोदरच केलेली आहे. ज्याचा जन्म पोटात आठ महिने अगोदरच झालेला असतो आणि सर्वात शेवटी खर्‍या अर्थाने थांबणारा अवयव म्हणजे ह्रदय आहे. अशा ह्रदयाला ‘तो’ एवढा लेचापेच्या ठेवेल ? माणसाने स्वबुद्धी वापरून तयार केलेल्या यंत्रात दर आठ दिवसांनी ‘नवीन अपडेट्स’ येत असतात. पण ‘त्याने’ तयार केलेल्या या यंत्रात आजपर्यंत कधीही अपडेट्स आणलेली नाहीत, तशी गरजही निर्माण झाली नाही. उलट ‘त्याने’ तयार केलेल्या रक्ताच्या पीएच मधे उगाचच कायमस्वरूपी एस्पीरीन, स्टॅटीन देत रक्ताची ओरोजिनल पीएच बदलवण्याचा अधिकार डाॅक्टरना कुणी दिला ? त्याचे अन्य अवयवांवर दुष्परिणाम दिसणार नाहीत ? बरं इतर कोणत्याही अवयवांच्या एलोपॅथी डाॅक्टरना पण या गोळ्या दात पाडायला, छोटी शस्त्रकर्म करायला वा औषधी सल्ले द्यायला मोठा अडथळाच ठरतात.
आता ओरीजिनल पीएच बदलून टाकल्यावर डुप्लीकेटनी शरीराची क्षमता कशी वाढेल ? उलट जे होतं, त्याचा बट्ट्याबोळच होतो.
अंगातील सर्व रक्त जाड होतंय हे कसं कळलं ? ते पातळ करण्याचं कारणच काय ? ( क्षमस्व, सामान्यांना ज्या भाषेत समजावून सांगितले जाते, त्याच भाषेत लिहितोय, वैद्यकीय भाषा वापरत नाहीये.)या जाड होण्यामागे आधी काही वर्ष सुरू करून ठेवलेली बीपीची गोळी तर नसेल ? या गोळयांनी लघवीला जास्ती होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी केले जाते, त्यामुळेच रक्तदाब तात्पुरता कमी झालेला दिसतो. ( दिसो! )
एका औषधानी दुसरा रोग जन्माला घालणे, यालाच माॅडर्न फार्मसी म्हणतात बरे ! ? ( आयुर्वेदातील उत्तम औषधाचे गुणधर्म वर्णन केलेले आहेत, बहुकल्पम् बहुगुणं संपन्नम् योग्य औषधम् l
विस्तारभयास्तव जास्ती लिहित नाही.) या औषधांची विशेषतः ज्येष्ठ नागरीकांना चटकच लागली आहे. बीपीची गोळी म्हणजे जणुकाही अमृतच असा प्रचार केला जातोय, पण प्रत्यक्षात हीच पूतना मावशी आहे. माय ( आयुर्वेद ) मरो, पण मावशी जगो ! असा विचार आयुर्वेदातील तज्ञ, जाणकार, ज्येष्ठ वैद्य पण करतात, त्यांची कीव करावीशी वाटते.
असो. ज्याचा त्याचा प्रश्न. मी तर माझ्याकडे आलेल्या रुग्णांच्या या अनावश्यक गोळ्या बंद करतो. 90% रुग्णांना खूपच फायदा होतोय आणि कायमस्वरूपी औषधे बंद होतात. 10% रुग्णांची बीपीची भीती कमी करायला मीच अजून कमी पडतोय.

या दहा टक्के लोकापैकी पाच टक्के असाध्यच असतात. आणि पाच टक्के याप्य (चिकित्सा करायला खूप कठीण) असतात. एवढी कल्पना नातेवाईकांना दिली की मेडीकोलीगल विषय संपतो.
पण 90 % टक्के जणांची अनावश्यक औषधे बंद होतात, हे 100% व्यावहारीक सत्य आहे.

तर ….
विषय ह्रदयरोगाचा होता. जेवढा दिखावा आहे, तेवढा हा रोग गंभीर नक्कीच नाही. कोणत्याही यंत्राशिवाय हे सर्व रोग आपण आटोक्यात नव्हेत, तर हे रोग कायमचे घालवू शकतो. आयुर्वेदाच्या अभ्यासात ह्रदय सांगितलेच नसेल का ? नाडी परीक्षा, शब्द स्पर्श, रूप रस गंध परीक्षा इंद्रिय परीक्षा, अवयव परीक्षा, मल मूत्र परीक्षा, दोष, दूष्य, प्रदेश परीक्षा, बल परीक्षा, काल परीक्षा, वय परीक्षा, मनाची चिकित्सा, प्रकृती परीक्षा, अग्नि परीक्षा, सात्म्यता परीक्षा, आहारातील पथ्यापथ्य सांगणे या आयुर्वेदातील उत्तम परीक्षा पद्धती आहेत. या पद्धतींचा वैद्यकीय व्यवहारात विसर पडलाय.
जसा हृदयरोग, तसाच मधुमेह, थायराॅईड, कर्करोग, पीसीओडी, वा माॅडर्न मेडीसिन मध्ये मोठमोठे विंग्रजी शब्द वापरून नवनिर्माण सेनेने केलेले रोग, नेत्यांची शाब्दीक भाषणं ऐकण्यापुरतेच मर्यादित ठेवावे, जिंकायचं असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही.
अट एवढीच या सर्व रोगांचे निदान, फक्त आणि फक्त भारतीय आयुर्वेदीय पद्धतीनेच ( वर वर्णन केलेल्या परीक्षा पद्धतीने ) व्हावे.

आणि ज्या व्यक्ती खालीलपैकी कोणत्याही एका क्षेत्राशी संबंधीत असतील तर त्यांना गंभीर आजार होणारच नाहीत, असा विश्वास ठेवावा.
जसे, कोणत्याही उपासना पद्धतीतले, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत, आध्यात्मिक संस्थेशी संबंधित, कोणत्याही योगगुरूंच्या सिद्धांतानुसार योग करणारे, अगदी माॅर्निंग वाॅक करणारे, एरोबिक्स, जिम, हास्यक्लबमधे जाणारे, नियमित पोहोणारे, धावणारे वा सायकलपटू, वा खुशालचेंडू आयुष्य सहजपणे जगणारे, पूर्ण आस्तिक पूर्णपणे नास्तिक, निसर्गोपचार तज्ञ, पिरॅमिड तज्ञ, वास्तुशास्त्री, रंगचिकित्सक, ज्योतिष, हस्तरेषा, सामुद्रीक विश्वासू, अंकशास्त्रावर विश्वास असणारे, आयुर्वेद तज्ञ इ. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींना एक शक्ती त्या त्या क्षेत्रातून मिळतच असते, जी जगणं सुसह्य करायला उपयोगी ठरत असते.
अपघात, वीज पडणे, खून होणे, आत्महत्या, इ. दैवी गोष्टी या आपल्या हाती नसतात.
एवढं करूनही जेव्हा एखाद्या क्षणी अशा गंभीर आजाराचे निदान केले जाते ते एकतर निदान चुकीचे असणे, व्यावसायिक हेतु ठेवून औषधोपचार अथवा शस्त्रकर्म करणे, किंवा केवळ कर्माचे भोग असतात, असे समजावेत, यालाच आयुर्वेदातील आधीदैविक व्याधी म्हटलेले आहे.
काही पाच टक्के व्याधी अवस्थांमध्ये एलोपॅथी वापरून रिझल्ट दिसतात, तिथे आजच्या घडीला वैद्यबुद्धी कमी पडते असे समजावे, एवढा विश्वास आयुर्वेद सिद्धांतावर हवा.
असो.
थोडक्यात,
कोणत्याही रोगाचे निदान, वैद्यांनी पूर्णतः आपल्या स्वतःच्या बुद्धीमत्तेनेच करावे. त्यासाठी अन्य पॅथीच्या एकाही औषधावर वा निदान पद्धतीवर अवलंबून रहाण्याची अजिबात आवश्‍यकता नाही.
…..गंमत म्हणून, सहज म्हणून, गेलोच आहे तर तपासून पहावे म्हणून, वेळ होता म्हणून, पाॅलीसीसाठी म्हणून, कंपनीतर्फे फ्री चेक अप कॅम्प होता म्हणून, मनाने ठरवले, बहिणींनी सुचवले, भावोजींना वाटले म्हणून केलेल्या माॅडर्न मेडीसीनच्या यांत्रिक तपासण्या आपल्याला आणखी क्रायसीस मध्ये नेऊन सोडतात असा अनुभव आहे.
अज्ञानात रहा, सुखी रहा. बुद्धीचातुर्याचा योग्य ठिकाणी वापर करा, विवेकशीलता ठेवा,
वाग्भटजी म्हणतात, आपण निरोगी आहोत, हे समजायला स्वतःचे मन, बुद्धी, आत्मा आणि इंद्रिय प्रसन्न आणि स्थिर हवेत. त्यामुळे आपण निरोगी आहोत, हे सांगायला स्वतःपेक्षा अन्य मोठ्या डाॅक्टरची अजिबात गरज नाही. काही गोष्टी लेखी शब्दात मांडता येत नाहीत. त्या समोरासमोर प्रत्यक्षात भावनेच्या रूपात मनातून व्यक्त होतात. त्याला अन्य कागदी पुराव्यांची गरज नसते.
समजणार्‍याला शब्दांचा मार पुरे असतो.
शिल्लक आहे ते आयुष्य मस्त, प्रसन्न, आनंदी, आजच्या भाषेत सांगायचे तर healthy and happy ठेवायचे तर आजच्या वैद्यकीय क्षेत्रापासून सुरक्षित अंतरावर रहा. कोण केव्हा कसा सल्ला देईल ते सांगता येणार नाही.

इथे बैसले रावण सारे,
दशमुखानी वदती सतत l
सल्ले ऐकूनी भ्रमिष्ट होशी
योग्य अयोग्य नाही कळत ll

आत बैसला मोठा डाॅक्टर,
आत्माराम वदती तयाला
आहे सूक्ष्मात तो भारी
मग स्थूलाची मदत कशाला ?

पाश्चात्त्य तंत्र सोडूनी द्यावे,
भारतीय शास्त्र हाती धरावे
बाकी सर्व ईश्वरार्पण करावे,
निरोगी आनंदी आयुष्य जगावे

चुकभूल देणे घेणे.
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग


error: Content is protected !!