ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

केवडिया प्रमाणेच पोंभूर्ले सुद्धा जगाच्या नकाशावर आणू या ; योगेश वसंत त्रिवेदी यांचे कळकळीचे आवाहन ; सर्वच पत्रकार संघटनांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या भव्य स्मारकासाठी एकत्र यावे

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती असली की एखादे काम पूर्ण करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक अवघ्या चार वर्षांत उभे करुन दाखवून दिले आहे. २०१४ पूर्वी केवडिया हे कुणाला माहित होते ? स्टेच्यूऑफ युनिटी च्या माध्यमातून जर केवडिया जगाच्या नकाशावर येऊ शकते तर मग ज्या आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ ६ जानेवारी १८३२ रोजी रोवली त्या बाळशास्त्रींचे पोंभूर्ले हे जन्मगाव जगाच्या नकाशावर का येऊ शकत नाही ? असा सुस्पष्ट सवाल करुन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले येथील राष्ट्रीय स्मारकासाठी सर्वच पत्रकार संघटनांनी एकत्र यावे, असे कळकळीचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेल्या पोंभूर्ले येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी दर्पण पुरस्कार विजेते या नात्याने योगेश वसंत त्रिवेदी यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पोंभूर्ले हे जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वच पत्रकारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मराठी पत्रस्रुष्टीची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली त्या बाळशास्त्रींच्या जन्मगावी येण्याची आणि त्यांच्या घराची पवित्र माती भाळी लावण्याचे भाग्य आम्हाला केवळ रवींद्र बेडकिहाळ यांच्या मुळेच मिळाले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून योगेश वसंत त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, मुंबई येथे सुद्धा आचार्य बाळशास्त्री यांचे स्मारक उभे राहावे ही कल्पना चांगली आहे परंतु मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मारके रांगेत आहेत, ही कधी उभी राहणार ? याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. मग बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी कोण, कधी आणि कसे प्रयत्न करणार ? हाच खरा प्रश्न आहे. मुंबई येथे जरुर बाळशास्त्रींचे स्मारक उभे रहायला हवे पण त्याचबरोबर पोंभूर्ले ही पत्रकारांची पंढरी, पत्रकारांची काशी अयोध्या आहे, या भूमीला जगाच्या नकाशावर आणणे हाच पत्रकार दिनाचा खरा संकल्प योग्य ठरेल, असे सांगून योगेश वसंत त्रिवेदी यांनी हिंदी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाबूराव विष्णू पराडकर यांचे पराड हे कोकणातले गाव सुद्धा आपण पुढे आणले पाहिजे, असेही सांगितले. कोकण हे निसर्ग समृद्ध असून पर्यटनाच्या द्रुष्टीने महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो याच द्रुष्टिकोनातून पोंभूर्ले आणि पराड यांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा, ओघानेच बाळशास्त्री आणि बाबूराव पराडकर यांची स्मृती चिरंतन राहील, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. रवींद्र बेडकिहाळ, लोकमत कोल्हापूर चे संपादक वसंतराव भोसले, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर आदी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले.

error: Content is protected !!