पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करा” मागणीसाठी ११ ऑक्टोबर रोजी पत्रकारांचे “एसएमएस पाठवा आंदोलन
मुंबई:पत्रकार संरक्षण कायदयाची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील पत्रकार २५ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या ११ ऑक्टोबर २५ रोजी एसएमएस पाठवा आंदोलन केले जाणार आहे.. या दिवशी महाराष्ट्रातील पत्रकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हजारो एसएमएस पाठवून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधतील.. सर्व प्रमुख पत्रकार संघटनांनी मिळून स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाचा वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे..
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक २०१७ मध्ये संमत झाले.. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली. ८ डिसेंबर २०१९ मध्ये भारत सरकारच्या गँझेटमध्ये कायदा प्रसिध्द झाला .. मात्र त्याच्या अंमलबजावणीबीबतचे नोटिफिकेशन राज्य सरकारने न काढल्याने हा कायदा अंमलात आला नाही.. सरकारने तातडीने नोटिफिकेशन काढावे यासाठी विविध पत्रकार संघटना पाठपुरावा करत असताना देखील कायदा अजून अस्तित्वात आला नाही.. अखेर सर्व संघटनांनी एकत्र येत २५ नोव्हेंबरला लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला.. ११ ऑक्टोबर चे आंदोलन हे २५ नोव्हेंबरच्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे..
पत्रकारांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नसल्याने राज्यात पत्रकारांवरील हल्ले मोठ्या संख्येने वाढले आहेत.. अलिकडच्या काळात नाशिक, मुंबई, अमरावती, करमाळा येथे पत्रकारांवर हल्ले झालेत.. हल्लेखोरांवर जुजबी कारवाई झाल्याने ते मोकाट आहेत.. पत्रकारांना धमक्या देण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे… हे सर्व वास्तव मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देण्यासाठी, आणि पत्रकारांच्या संतप्त भावना त्यांच्या कानावर घालण्यासाठी एसएमएस पाठवा आंदोलन केले जात आहे.. महाराष्ट्रातून लाखो एस एमएस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जातील अशी अपेक्षा आहे. एसएमएस आंदोलनात राज्यातील पत्रकारांनी सहभागी होऊन आपल्या संतप्त भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालाव्यात असे आवाहन पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्यावतीने सहभागी संघटना मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, बृहन्मुंबई यूनियन ऑफ जर्नालिस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशन,पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे श्रमिक पत्रकार संघ, मुंबई हिंदी पत्रकार संघ, नॅशनल यूनियन जर्नालिस्ट ऑफ इंडिया, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, जर्नालिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र, डिजिटल मिडिया परिषद,बीयूजे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांनी केले आहे…
