ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अमृतमहोत्सवी प्रल्हाददादांची अमृतवाणी ! -योगेश वसंत त्रिवेदी,

.. ३ नोव्हेंबर १९९६ ! स्थळ : बदलापूर ! कार्यक्रम : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांचे प्रवचन ! मी दैनिक ‘सामना’चा उपसंपादक म्हणून कार्यरत होतो आणि माझे वास्तव्य अंबरनाथ येथे होते. तिथल्या महाराष्ट्र बॅंकेचे अधिकारी प्रा. सुहास पटवर्धन यांचा परिचय झाला होता आणि त्यांनी मला ‘सामना’चा उपसंपादक या नात्याने सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या बदलापूर येथील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले होते ‌ मी, माझी धर्मपत्नी सौ. माया आणि ॲड. शशीकला रेवणकर असे आम्ही तिघे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे प्रवचन असल्याने मी तिथे भाषण करणे माझ्या दृष्टीने अप्रस्तुत होते, म्हणून सद्गुरु आणि श्रोते यांच्यात मी अडथळा होऊ इच्छित नाही, असे सांगून सद्गुरु श्री वामनराव पै यांना प्रणाम करून समोर बसलो. पृथ्वी गोल आहे. संपूर्ण वर्तुळ पूर्ण झाले पाहिजे, असा नियतीचा संकेत असावा. मी १९९७ साली बोरीवली पूर्व येथे वास्तव्यास आलो. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, अनिल जोशी आणि मी असे तिघे पत्रकारांचे त्रिमूर्ती बोरीवली येथे एकत्र फिरत होतो. मित्रमंडळी वाढत गेली. विजय वैद्य यांच्या सामाजिक कार्यात सहभागी होत होतो. अचानक २०१६ साली “हुं तमारी दिकरी छुं” असे म्हणत प्रा. नयना रेगे ही कन्या माझ्या आयुष्यात आली. मला एकमेव मुलगा आहे, परंतु तीन मुलींचे मी कन्यादान केले आहे आणि ही कन्या माझ्या आयुष्यात आल्याने खऱ्या अर्थाने मी अधिक श्रीमंत झालो. ही कन्या सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन परिवारात नामधारक आहे. जीवनविद्या मिशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या बातम्या/लेख प्रसिद्धीसाठी पाठविणे माझे कर्तव्यच आहे, अशा पद्धतीने मी कार्य करीत राहिलो. मी तोवर ‘सामना’तून सेवानिवृत्त होऊन मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत झालो होतो. माझ्या कन्येच्या माध्यमातून सद्गुरु श्री वामनराव पै यांचे चिरंजीव आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाददादा पै यांच्या संपर्कात आलो. कोरोना महामारीच्या जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाददादा पै यांचे विजय वैद्य यांच्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत दूरदृष्य प्रणालीद्वारे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कन्येच्या कल्पक आयोजनामुळे विजय वैद्य यांची जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सातासमुद्रापार भरारी घेत झाली. याच काळात मी दोन पुस्तके प्रकाशित केली. अर्थात या पुस्तकांचा उदय सुद्धा विजय वैद्य आणि पैंमुळेच झाला. (ॲड आर्टसचे कला भूषण मित्रवर्य श्री उदय पै) ‘पासष्टायन’ या पुस्तकाचे नामकरण कन्येनेच केले जे सर्वार्थाने योग्य आहे. पासष्टायनचे प्रकाशन लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांच्या शुभहस्ते ३ एप्रिल २०२२रोजी झाले. ‘गुरुजी’ या पुस्तकाचे प्रकाशन करायचे होते. कन्येला सांगून श्री. प्रल्हाददादा पै यांचा होकार मिळविण्यासाठी औपचारिकता पूर्ण केली आणि त्यांच्याच मुख्यालयात कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत ५ ऑगस्ट २०२२ रोजी माझ्या आयुष्यातील अभूतपूर्व ऐतिहासिक देवदुर्लभ सोहोळा संपन्न झाला. चिरंजीव प्रशांतने “बाबा, राजकीय पुस्तकाचे प्रकाशन श्री. प्रल्हाददादा पै यांच्या शुभहस्ते करण्याचे प्रयोजन काय?” असे विचारले असता मी सांगितले की, राजकारण भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी अध्यात्मिक विचार महत्वाचे आहेत. आणि आदरणीय श्री प्रल्हाददादा पै यांना ही कल्पना प्रचंड आवडली. त्यांनी आपल्या भाषणात तसेच मार्गदर्शन केले. दिवसामागून दिवस पुढे सरकत होते. आणि एक दिवस अचानक कन्येने कर्जत येथील जीवनविद्या मिशन तर्फे चालविण्यात येणाऱ्या ज्ञानपीठ/विद्यापीठ येथे मला येण्याची विनंती केली. मला तो आदेशच होता. पहाटेच बसने कर्जत येथे निघालो. त्या ज्ञानपीठ/विद्यापीठात पोहोचलो. हजारो नामधारक जमले होते. मी आपला एक श्रोता म्हणून मधल्या रांगेत बसलो. सम्राट सुर्वे यांना माझ्या सोबतीला बसविले होते. डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, मुख्याध्यापक, मोठमोठाल्या महनीय व्यक्तींची जणू काही मांदियाळीच जमली होती. कन्येने आधीच चक्रे फिरविली होती आणि व्हायचा तो परिणाम झाला. आदरणीय श्री प्रल्हाददादा पै यांच्या सूचनेनुसार मला पहिल्या रांगेत बसविण्यात आले. भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी वैभव निंबाळकर तद्वतच प्रख्यात डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या समवेत बसलो होतो. व्यासपीठावरुन माझ्या नावाची उद्घोषणा झाली आणि मला आदरणीय श्री प्रल्हाददादा पै यांच्या शुभहस्ते सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष पदकाने हजारोंच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. सद्गुरु श्री वामनराव पै आणि त्यांचे चिरंजीव श्री प्रल्हाददादा पै या दोघांच्या सहवासाचा/सत्संगाचा लाभ मिळालेला मी भाग्यवान ठरलो. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या भव्य तसबिरीसमोर साष्टांग प्रणिपात केला आणि श्री प्रल्हाददादा पै यांच्या अनुमतीने थोडक्यात २५ वर्षांतील या महत्वपूर्ण बाबी नमूद केल्या. कर्जत येथील जीवनविद्या मिशनचे जे ज्ञानपीठ /विद्यापीठ आहे त्यात कुटुंबासह सत्संग प्राप्त करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजकाल मनुष्याला मनःशांती मिळणे आवश्यक आहे आणि माणसाची बौद्धिक पातळी वाढून मनःशांती मिळणे यासाठी जीवनविद्या मिशनचे संस्कार महत्त्वाचे आहेत. सुख, समाधान, आनंद, समृद्धी, ऐश्वर्य अशा नावांच्या खोल्या कर्जत येथे आहेत. आपण कुठे राहतो ? सुखात, समाधानात, समृद्धीत, आनंदात, ऐश्वर्यात. बरं, उपहारगृहाचे नांव पण तृप्ती. म्हणजे सात्विक आहार घेऊन समाधानाचा, तृप्तीचा ढेकर माणूस देऊ शकतो. आहे की नाही कमाल ? आता नमनाला घडाभर तेल नको. मूळ विषय हा आहे की, जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाददादा पै यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या अमृतवाणीचा. श्री प्रल्हाददादा वामनराव पै म्हणजे जीवनविद्या मिशनचे असे नेतृत्व आहे की, जे आपल्या मानसिक परिवर्तन आणि जीवन व्यवस्थापन कौशल्यांनी कृतज्ञ पिढी निर्माण करीत आहेत. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे उत्तराधिकारी म्हणून, श्री प्रल्हाद वामनराव पै, त्यांच्या वडिलांचा निःस्वार्थ सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी झटत आहेत. जीवनविद्या तत्त्वज्ञानाच्या वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनामुळे प्रल्हाददादा पै यांना खूप रस होता. ते १९८५ पासून जीवनविद्या मिशनमध्ये सहभागी आहेत आणि गेल्या २५ वर्षांपासून ते जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त म्हणून त्याचे नेतृत्व करीत आहेत. निःस्वार्थी व्यक्तिमत्व असलेले प्रल्हाददादा पै हे सुसंस्कृत, कृतज्ञ आणि सुशिक्षित भावी पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तरुणांशी अत्यंत समजण्याजोग्या, स्पष्ट आणि व्यावहारिक पद्धतीने केलेल्या त्यांच्या मनापासूनच्या संवादांमुळे त्यांना ‘युवा आयकॉन आणि मार्गदर्शक’ ही पदवी मिळाली आहे. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवणारे श्री प्रल्हाददादा पै नेहमीच सत्कार्याची ग्वाही देतात. ‘राष्ट्र प्रथम’ या दृष्टिकोनानुसार ते जगतात. त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्यांनी आणि विस्तृत कॉर्पोरेट अनुभवाने, त्यांनी जीवनविद्या तत्वज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण कार्यक्रम, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि वेबिनारची सुरुवात केली आहे आणि त्यांची रचना केली आहे. सी-लेव्हल एक्झिक्युटिव्हसाठी आयोजित केलेल्या कॉर्पोरेट अभ्यासक्रमांचा भाग म्हणून ते सर्वात प्रिय आणि विचारात घेतलेले फॅकल्टी सदस्य आहेत. ते जितके सुशिक्षित आणि निपुण व्यावसायिक आहेत, तितकेच ते साधे आणि अनुकरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. श्री. प्रल्हाददादा पै यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी अलंकृत करण्यात आले आहे. ज्या राष्ट्र-प्रथम समुदाय निर्माण करण्यात त्यांच्या योगदानाचा गौरव ठरतात. समाज भूषण सांगली, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गुरु महात्म्य पुरस्कार, तरुण आणि व्यावसायिकांसाठी उपयुक्त असलेल्या विविध विषयांवर चर्चा करणारी लोकप्रिय ‘प्रल्हाद पै स्पीक्स’ मालिका सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करुन घेतला आहे. श्री प्रल्हाददादा पै यांनी जीवनविद्या मिशनच्या संस्कारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उच्चविद्याविभूषित मान्यवरांची जबरदस्त फळी तयार केली असून या मान्यवर व्यक्ती विविध कार्यक्रमांतून, व्याख्यानमालांमधून मनःशांती, अंतर्मन, बहिर्मन, मनाचे व्यवस्थापन अशा विविध विषयांवर समाजाला यथोचित मार्गदर्शन करण्याचे, समजावून सांगण्याचे भगीरथ कार्य करीत आहेत. श्री. प्रल्हाददादा पै यांच्या अमृत बोल या कार्यक्रमाद्वारे त्यांची अमृतवाणी साता समुद्रापार पोहोचली आहे म्हणूनच मी त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांची अमृतवाणी सर्वत्र पोहोचून त्यांचे मार्गदर्शन सातत्याने लाभो, यासाठी त्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, अशी सद्गुरु चरणी विनम्र प्रार्थना करीत आहे. “हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे ; सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव ; सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे”, ही सद्गुरु श्री वामनराव पै यांनी रचलेली आणि श्री प्रल्हाददादा पै यांनी जागतिक अधिष्ठान मिळवून दिलेली विश्व प्रार्थना सर्वतोमुखी होवो. यातच सर्वांच्या सुखी, आनंदी, समृद्ध संसाराची भरभराट निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल ! -योगेश वसंत त्रिवेदी, (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)

error: Content is protected !!