[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

दोन बहिणींशी विवाह त्याने केला- टॅक्सी वाल्यावर गुन्हा दाखल झाला


मुंबई -एका टॅक्सीवाल्याने दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला . पण हा विवाह म्हणजे हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करून एकाने तक्रार दखल केल्याने नावरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हनिमूनसाठी पर्यटनस्थळी जाण्या ऐवजी त्याच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी आली आहे.

पत्रिका छापून वाजत गाजत केलेले लग्न आता अडचणीत येण्याची शक्यता असून कायद्यात जरी पळवाटा असल्या तरी समाजाची चौकट मोडणाऱ्या या दाम्पत्यावर कारवाई करण्याची मागणी आता विविध महिला प्रतिनिधींकडून समोर येऊ लागली आहे. मूळचा महाळुंग परिसरातील अतुल आवताडे याने मुंबईच्या कांदिवली येथील रिंकी आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणींच्या सोबत केलेल्या अनोख्या विवाहानंतर सोशल मीडियात यावर प्रतिक्रिया उमटू लागताच पोलिसांनी एकाच्या तक्रारींवर अदखलपात्र नोंद घेतली खरी मात्र आता यानंतर समाजातील महिला वर्ग आक्रमक झाल्याने पोलिसांच्या समोरचा पेच देखील वाढत चालला आहे.

खरे तर पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार ही तक्रार दाखल करून घेतली होती. मात्र ही तक्रार यामुळे त्रास झालेल्या पीडितेलाच दाखल करता येते असे कायदेतज्ञांचे म्हणणे आहे . याशिवाय हिंदू विवाह कायद्यात अनेक त्रुटी असल्याने यातील पळवाट काढून हे दाम्पत्य कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत बाहेर पडेल असा दावा कायदेतज्ञ करीत आहेत. वास्तविक हिंदू विवाह त्रुटी दूर करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती आता गरजेची बनल्याचे सांगताना अशा पद्धतीचा दुर्मिळातील दुर्मिळ विवाह होऊ शकेल याची कल्पना कायदे मंडळाला नसल्याने या प्रवधानाचा फायदा या दाम्पत्याला मिळू शकणार असल्याचे विधिज्ञ धनंजय रानडे सांगतात. अशा लग्नामुळे समाजात चुकीचे मेसेज जाऊन हिंदू विवाह पद्धती मोडकळीस येईल अशी भीती देखील रानडे व्यक्त करतात.

या लग्नाच्या विरोधात मात्र कायम परस्पर विरोधी भूमिका असणारे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे अशा पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मात्र एकमत दिसून येत आहे. अशा पद्धतीच्या विवाहाने हिंदू धर्मातील विवाह व्यवस्था अडचणीत येऊ शकेल आणि भविष्यात काही वाद झाल्यास यातील एकीला अडचणीला सामोरे जावे लागेल, अशी भीती राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी यांना वाटते. यासाठी कायद्यात दुरुस्ती गरजेची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपच्या डॉ प्राची बेणारे यांनी अशा लग्नाने हिंदू विवाह संस्थेची चौकट भेदण्याचा प्रयत्न शासनाने कडक कारवाई करून हाणून पाडावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेना युवासेनेच्या जिल्हाध्यक्ष पूनम अभंगराव यांनी हिंदू धर्मातील संस्कृतीवर हा हल्ला असल्याचे सांगत समाजात यामुळे चुकीचा संदेश जाणार असल्याचे सांगितले. विश्व हिंदू परिषदेच्या मातृ आघाडी सांभाळणाऱ्या रेखा टाक यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करताना याबाबत समाजाने आणि शासनाने गंभीरपणे विचार करण्याचा इशारा दिला. मनसेच्या संगीत ताड यांनी देखील या समाजविघातक कृत्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. यावर अतिशय कठोर शब्दात टीका करताना यामुळे विवाह व्यवस्था, कुटुंब व्यवस्था आणि त्याला अनुसरून समाज व्यवस्था बिघडण्याचा धोका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शैला गोडसे यांनी व्यक्त केला.

एका बाजूला महिलांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना या विवाहाला उपस्थित असणारे वऱ्हाडी , हॉटेल मालक , तक्रारदार आणि अगदी पोलीस देखील माध्यमांना टाळण्याचे काम करत आहेत. या विवाहामुळे पोलिसांनी अदखलपात्र तक्रार दाखल करून घेऊन आपली जबाबदारी झटकली आहे. मात्र समाज व्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या अशा विवाहास मान्यता मिळाल्यास भविष्यात कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेऊन अनेक तरुण अशा पद्धतीची समाजाची चौकट मोडणारी कृत्य करतील. त्यामुळे शासन आणि न्याय व्यवस्थेने हिंदू विवाह पद्धतीत असणाऱ्या त्रुटी दूर न केल्यास समाज व्यवस्था बिघडण्याचे संकट आ वासून उभे राहील. सध्या तरी अतुल आणि पिंकी रिंकीचा संसार नव्याने सुरु झाला असला तरी अतुलवार कायद्याची आणि समाजाची टांगती तलवार राहणार हे मात्र नक्की.

error: Content is protected !!