एकत्र होण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत
मनसे शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्यात संकेत
मुंबई/गेल्या अनेक दिवासंपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का? असा प्रश्न केला जात आहे. या युतीसाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळेच शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यात मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा होणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. या मेळाव्याला मनसेचे प्रमुख राज ठाकरे हेदेखील हजर राहू शकतात, असे म्हटले जात होते. प्रत्यक्ष मात्र राज ठाकरे या मेळाव्यात आले नाहीत. मात्र आपल्या भाषणादरम्यान ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर मोठे भाष्य केले. त्यांच्या या विधानानंतर आता भविष्यात लवकरच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात धडाकेबाज भाषण केले. आपल्या या भाषणता त्यानी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केले. “अनेकांना प्रश्न पडला आहे की, मी आता पुढचा कार्यक्रम काय देणार. अनेकांना प्रश्न पडलाय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलै रोजी आम्ही काय केलं होतं? मी तेव्हाच बोललेलो आहे की आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत,” असे मोठे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.तसेच जिथे कोणी माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसात फूट पडू देणार नाही. मराठीवर हिंदीची सक्ती मी खपवून घेणार नाही. आमचा हिंदीला विरोध नाही. पण हिंदीची सक्तीही आम्ही खपवून घेणार नाही. भाषावार प्रांतरचना झाली. यानुसार गुजराती लोकांना गुजरात मिळाले. तसेच मराठी भाषकांना महाराष्ट्र मिळाला. ही मुंबई मराठी माणसाने रक्त सांडवून मिळवलेली आहे. ही मुंबई व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर आम्ही हा खिसा फाडून मुंबई राखल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर मराठीला हात लावून दाखवा. हात जागेवर ठेवणार नाही, असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
