भारतावर २५ टक्के कर लादल्याने भारत अमेरिका संबंध बिघडणार
नावी दिल्ली/अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर २५ टक्के कर लावला असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारताला याचा आर्थिक फटका बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध तितकेसे चांगले नाहीत असंही विधान केलं आहे. आता अमेरिकेने कर लावल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आता अमेरिकेने भारतावर कर लादण्याचे खरे कारणही समोर आले आहे.काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात या कराबाबत करार होण्याची शक्यता होती, मात्र करार होऊ न शकल्याने अमेरिकेने कर लादल्याची घोषणा केली आहे. आता भारत सरकारनेही शेतकरी, लघु उद्योजक आणि एमएसएमई क्षेत्राच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं असं म्हटलं आहे. तसेच आगामी काळात योग्य ते पाऊल उचलले जाईल असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.
अशातच आता अमेरिकेने भारतावर जास्त कर लादण्याचे खरे कारण समोर आले आहे. भारत आणि रशियामधील व्यापारी संबंध वाढले आहेत. त्यामुळे नाराज असलेल्या अमेरिकेने भारतावर मोठा कर लादला असल्याचे समोर आले आहे. कारण भारत रशियाकडून कमी भावात कच्चे तेल खरेदी करत आहे. भारताचा हा निर्णय अमेरिकेला पटलेला नाही. अमेरिकेने याआधी रशियाकडून तेल न खरेदी करण्यासाठी भारतावर दबाव टाकला होता, मात्र भारताने तेल खरेदी करणे सुरुच ठेवले होते. याची शिक्षा भारताला देताना अनेरिकेने हा कर लादला आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला फायदा होत असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. त्यामुळे अमेरिकेने भारतासह इतर काही देशांना तेल खरेदी न करण्याचा इशारा दिला होता. तसेच जर या देशांनी तेल खरेदी करणे सुरु ठेवले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही अमेरिकेने म्हटलं होतं. त्यामुळेच ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादला आहे.
