कर्जमाफीची तारीख जाहीर करा तरच माघार!शेतकरी आंदोलक आक्रमक
नागपूर/बच्चू कडू, राजू शेट्टी, कॉ. अजित नवले, महादेव जानकर आणि इतर शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांकडून नागपूरमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल दाखल झाले आहेत. बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं की आम्ही शांत बसलो की सरकार शांत होतंय. आम्ही जेलभरो करायला लागलो की तुम्ही लगेच आलात. आम्ही चार वाजता तुम्ही येणार यासाठी वाट पाहिली. सहा वाजता कोर्टाचा आदेश आला तुम्ही यायला हवं होतं, आम्ही जेलभरो करायला गेलो तुम्ही आलात, असं बच्चू कडू म्हणाले. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारनं केलेल्या विनंतीप्रमाणं बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील. या काळात आंदोलन शांततेत सुरु राहिल्यास कुठलाही त्रास प्रशासनाकडून होणार नाही, असं पंकज भोयर म्हणाले. तर, बच्चू कडू यांनी आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं. सरकारनं कर्जमुक्तीची तारीख सांगावी यासाठी लढा असल्याचं म्हटलं.नेमकं काय चालू आहे, आम्ही काय घरच्यांसाठी आंदोलन करत नाही. हे तुम्ही बोलला होता, तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. एमएसपीच्या 20 टक्के बोनस दिला होता. यावर्षी खरेदी देखील सुरु झाली नाही, गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी सुरु झाली होती, असं बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू, राजू शेट्टी, कॉ. अजित नवले, महादेव जानकर आणि आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांची भर पावसात चर्चा सुरु होती. यावेळी आशिष जयस्वाल यांनी सरकारसोबत चर्चेला वेळ द्यावा, सरकार योग्य निर्णय घेईल, असं म्हटलं. काही हिंदी चित्रपट नाही, बारा वाजता शेतकरी रेल्वे रुळावर गेले की लगेच तुमचा निरोप आला, बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी मंत्री येत आहेत. आम्ही ते शेतकरी माघारी बोलावून घेतले. कोर्टानं काय ऑर्डर दिली आहे सरकारला माहिती होतं, कोर्टानं ऑर्डर सकाळी दिली होती, कोर्टाच्या कानात कुणी काय सांगितलं हे आम्हाला माहिती आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांची चेष्टा चालवलीय का हे बरोबर नाही. सरकारचा हा डाव होता की शेतकऱ्यांनी आक्रमक व्हावं, कायदा हातात घ्यावा, हे आंदोलन चिरडावं असा सरकारचा डाव होता, असं राजू शेट्टी म्हणाले. तुम्ही चर्चेला तयार व्हावा हे सांगायला आलात पण कधी बैठक आहे तुम्हाला माहिती नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. मीटिंगची तारीख तुम्हाला माहिती आहे का असा सवाल राजू शेट्टी यांनी आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर यांना विचारला.
राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आलो आहे. सरकार आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघेल, आपण वेळ द्यावी, चर्चेतून मार्ग निघेल. यावर बच्चू कडू यांनी दोन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांशी बोला आणि फोन लावा आणि कर्जमुक्तीबाबत हो आहे की नाही याबाबत विचारा, असं म्हटलं.
 
								 
															 
															 
															