मराठा आंदोलन चिघळणार – जरंगेना पाठिंबा देण्यावरून महायुतीत फूट
मुंबई /मुंबईत घुसलेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई जाम केली आहे.तर जरांगे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आमरण उपोषणामुळे सरकारची अक्षरशा कोंडी झाली आहे. त्यातच महायुतीचे काही आमदार जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्यामुळे, महायुतीतच फूट पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुंबई सोडण्यास तयार नसलेल्या जरांगे बरोबर सरकारच्या वाटाघाटी सुरू असून त्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी एक दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत येऊन ठेपलं आहे. हे भगव वादळ आता पुढचा काही काळ मुंबईतच ठाण मांडून बसणार का? ते आगामी काळात स्पष्ट होईल. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी केवळ एक दिवसाची मुदत मिळाली होती. मुंबई पोलिसांनी २९ ऑगस्टच्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील यांना दिली होती. पण मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर ते मुंबईत आले आणि आज सकाळपासून आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला उत्सफुर्त असा प्रतिसाद मराठा समाजाकडून देण्यात येतोय. मराठा समाजाकडून शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केलं जात आहे. आंदोलनाची रूपरेषा पाहता आंदोलखी प्रशासनाला सहकार्य करीत आहेत
मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाकडून प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला होता. मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शिष्टमंडळाने प्रशासनाकडे केली होती. शिष्टमंडळाच्या या अर्जावर प्रशासन सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यांच्या याच प्रतिक्रियेवरुन मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनाला 1 दिवसांची मुदतवाढ दिली आहे
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा फटका आंदोलकांनादेखील बसत आहे. त्यामुळे पावसापासून बचाव व्हावा यासाठी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक आणि चर्चेगट रेल्वे स्थानकाचा आसरा घेतला आहे. पोलीस आंदोलकांना सहकार्य करताना दिसत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. तर मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील तातडीने शिर्डीहून मुंबईत दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंदेखील या आंदोलनाकडे बारीक लक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संध्याकाळी मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत.
मराठा आंदोलनामुळे सरकारची कोंडी झालेली असतानाच, महायुतीतील प्रकाश सोळंके,विजयसिंग पंडित ,संदीप क्षीरसागर हे आमदार आझाद मैदानात जरांगेना भेटले. एकीकडे भाजपाचे काही नेते जरांगेवर खालच्या शब्दात टीका करीत आहेत, तर दुसरीकडे शिंदे आणि अजितदादांचे लोक जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून महायुतीत फूट पडल्याचे चित्र आहे.
