दक्षिण सुपरस्टार थलपती विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी – ३८ ठार,११५ जखमी
चेन्नई/अभिनय क्षेत्र गाजवून राजकारणात प्रवेश केलेला तमिळ अभिनेता थलपथी विजय याच्या शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून ११५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विजयने तमिझगा वेत्री कळगम नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. तामिळनाडूत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्याने जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून आज त्याने एक सभा आयोजित केली होती. या सभेसाठी हजारो लोक उपस्थित होते. याच दरम्यान गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली.
परिस्थिती हाताबाहेर गेल्याने विजयने आपले भाषण मध्येच थांबवले. गोंधळाच्या दरम्यान गर्दीतून एक मूल बेपत्ता झाल्याचे समजताच, विजय लोकांना मदत करण्यासाठी पोलिसांना आवाहन करताना दिसला.चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त करताना, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या पीडितांवर रुग्णालयात योग्य उपचार होत आहेत याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.स्टॅलिन यांनी माजी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी, आरोग्यमंत्री सुब्रमण्यम आणि करूर जिल्हाधिकारी यांना उपचारांबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. स्टॅलिन यांनी या प्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. त्यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी जनतेने डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चेंगराचेंगरीच्या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “तामिळनाडूतील करूर येथे एका राजकीय रॅलीदरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात त्यांना ताकद मिळो अशी प्रार्थना. जखमी पीडित लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.”असे मोदींनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.
