अयोध्येत कोणत्याही परिस्थितीत मशीद बांधायला परवानगी दिली जाणार नाही- भाजपा नेते विनय कटियार यांचे विधान
फैजाबाद/अयोध्येत नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. ‘अयोध्येत कोणत्याही मशिदीला परवानगी दिली जाणार नाही आणि मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडला पाहिजे, असे विधान भाजप नेते विनय कटियार यांनी केले आहे. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.राममंदिर आंदोलनाचे नेते आणि माजी खासदार विनय कटियार यांनी प्रस्तावित धन्नीपूर मशिदीबाबत मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे. कटियार यांनी म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत मशीद बांधू दिली जाणार नाही आणि मुस्लिमांनी येथून निघून जावे. एनओसी प्रलंबित असल्याने धन्नीपूर मशिदीच्या योजनेवर स्थानिक प्राधिकरणाच्या आक्षेपाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कटियार यांनी हे विधान केले, याबाबतचं वृत्त ‘एका वृत्तवाहिनीने’ ने दिलं आहे.
पत्रकार परिषदेत कटियार म्हणाले की, “बाबरी मशीद ऐवजी अयोध्येत मशीद किंवा इतर कोणतीही मशीद बांधू दिली जाणार नाही. त्यांना (मुस्लिमांना) येथे राहण्याचा अधिकार नाही. आम्ही त्यांना कोणत्याही किंमतीत अयोध्येतून हाकलून देऊ आणि नंतर दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी करू.’’
विनय कटियार म्हणाले की, आम्हाला धन्नीपूर मशीद माहित नाही. तेथे काहीही बांधले जाणार नाही. ते स्पष्टपणे म्हणाले की, जे लोक अयोध्येत मशीद बांधण्याबद्दल बोलत आहेत ते सर्व आम्ही नाकारले आहेत आणि हे यापुढेही होत राहील. ते म्हणाले की, ज्यांनी अयोध्येत मशीद बांधली त्यांनी शरयू नदीच्या पलीकडे जावे. गोंडा किंवा बस्तीला जा. अयोध्या रामाची नगरी आहे. येथे फक्त राम मंदिर आहे.
