नाट्य शुक्रवार हा पत्रकार संघाचा उपक्रम अविश्वसनीय – अरुण नलावडे‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचे ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडेयांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
मुंबई मराठी पत्रकार संघात प्रत्येक महिन्याच्या
चौथ्या शुक्रवारी नाटकाची तिसरी घंटा वाजणार
० प्रायोगिक रंगभूमीसाठी खुले व्यासपीठ
० प्रेक्षकांना मोफत प्रवेश
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या ऐतिहासिक वास्तूत ‘नाट्य शुक्रवार’च्या निमित्ताने नाटकाची तिसरी घंटा वाजत आहे, ही घटनाच ऐतिहासिक आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठी जे काम राज्यातील विविध नाट्य संघटनांनी, नाट्य कलाकारांनी करायला हवे, ते काम मुंबई मराठी पत्रकार संघ करीत आहे. ही घटनाच अविश्वसनीय आहे. पत्रकार संघाच्या या उपक्रमाने प्रायोगिक रंगभूमीला नवी दिशा मिळेल, असे कौतुकाचे उद्गार ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी शुक्रवारी येथे काढले.
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून आयोजित ‘नाट्य शुक्रवार’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, दिग्दर्शक-लेखक मिलिंद पेडणेकर, इंडियन ऑईलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉ. अभिषेक कुमार, विश्वस्त वैजयंती आपटे, राही भिडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर आणि नाट्य शुक्रवार समिती सदस्य रवींद्र देवधर व नयना रहाळकर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाट्य शुक्रवार’ हा अभिनव उपक्रम पत्रकार संघातर्फे सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी प्रायोगिक रंगभूमीवरील दर्जेदार नाट्यप्रयोगांचे मोफत सादरीकरण होणार आहे. नवोदित व प्रायोगिक रंगकर्मींसाठी हे व्यासपीठ खुले असणार असून नाट्यप्रेमींना प्रयोगांचा नि:शुल्क आनंद घेण्याची संधी यातून मिळणार आहे.
‘मी भारतीय’ या प्रदीप तुंगारे लिखित दीर्घांकाने या उपक्रमाला सुरुवात झाली. रविंद्र देवधर यांची संकल्पना व दिग्दर्शन लाभलेल्या या दीर्घांकात ऋषिकेश कानडे यांचाही अभिनय आहे. त्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘नाट्य शुक्रवार’ या उपक्रमात सहभागी नाट्यसंस्थेला पत्रकार संघातर्फे मोफत सभागृह आणि दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. उपक्रमासाठी पत्रकार संघाचे विश्वस्त देवदास मटाले, रविंद्र देवधर आणि नयना रहाळकर यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या परिश्रमांचे कौतुकही अध्यक्षांनी केले.
या उपक्रमाची संकल्पना मांडणारे संदीप चव्हाण यांचे एक रंगकर्मी म्हणून मी विशेष आभार मानतो, असे दिग्दर्शक-लेखक मिलिंद पेडणेकर यांनी सांगितले. उदयोन्मुख कलाकारांसाठी ही उत्तम संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या वैभवशाली नाट्यपरंपरेला चालना देणार्या ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमासाठी इंडियन ऑईल नेहमीच तत्पर असेल, असे आश्वासन इंडियन ऑईलचे कार्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉ. अभिषेक कुमार यांनी दिले. हा उपक्रम स्तुत्य असून इतर सामाजिक संस्थांसाठी पथदर्शी आहे, असे रवींद्र देवधर यांनी नमूद केले.
या नाट्यउपक्रमात ज्यांना आपल्या कलाकृती सादर करायच्या आहेत, त्यांनी देवदास मटाले (९७६९६६४४६४), रवींद्र देवधर (९४२२३४४५५५) व नयना रहाळकर (९३२२४९२६२९) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन यावेळी उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी केले
.फोटो ओळी
नाट्य. शुक्रवार उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ट अभिनेते अरुण नलावडे यांचा सत्कार करताना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण. सोबत दिग्दर्शक-लेखक मिलिंद पेडणेकर, इंडियन ऑईलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉ. अभिषेक कुमार, विश्वस्त वैजयंती आपटे, राही भिडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, रवींद्र देवधर आणि नयना रहाळकर
