ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबई मराठी पत्रकार संघात आता नाटकाची तिसरी घंटा वाजणार !

– ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाची मुंबई मराठी पत्रकार संघात घोषणा 0 प्रायोगिक रंगभूमीसाठी खुले व्यासपीठ 0 प्रेक्षकांना मोफत प्रवेश
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आता नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे. महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाट्य शुक्रवार’ या अभिनव उपक्रमाची घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आली.
या उपक्रमाअंतर्गत, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी महाराष्ट्रातील दर्जेदार प्रायोगिक नाट्याचे मोफत सादरीकरण होणार आहे. नवोदित व प्रायोगिक रंगकर्मींसाठी हे व्यासपीठ खुले असणार असून, नाट्यप्रेमींना नाट्यप्रयोगांचा नि:शुल्क आनंद घेण्याची संधी यातून मिळणार आहे.
लोकमान्य सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त देवदास मटाले, दिग्दर्शक आणि अभिनेता रविंद्र देवधर, पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, पत्रकार नयना रहाळकर उपस्थित होते.
येत्या २५ जुलै २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ट अभिनेते अरुण नलावडे, संजय मोने, दिग्दर्शक-लेखक मिलिंद पेडणेकर आणि इंडियन ऑईलचे कार्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉ. अभिषेक कुमार यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.
‘मराठी प्रोयगिक रंगभूमीला बळ देणं आणि नव्या प्रयोगशील नाटकांना मंच मिळवून देणं, हा ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचा मूळ हेतू आहे. पत्रकार संघ केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर समाजातील उपक्रमशील घटकांसाठीही एक प्रेरणास्थान असावं, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या उपक्रमाला ‘इंडियन ऑइल’चे प्रायोजकत्व लाभल्याचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.
या उपक्रमात सादरीकरण करणाऱ्या नाट्यसंस्थेला पत्रकार संघातर्फे १० हजार रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे. तसेच संघाचे सभागृह पुर्णता मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहीती अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. या नाट्य शुक्रवार उपक्रमाचे संचलन करण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वस्त देवदास मटाले यांच्या नेतृत्वाखाली रविंद्र देवधर आणि नयना रहाळकर यांची समिति स्थापन करण्यात आली असून नाट्य शुक्रवार अंतर्गत प्रायोगिक रंगभूमीची नाटकं स्वीकारण्याचा अंतिम निर्णय ही समिती घेईल. अशी माहिती अध्यक्ष चव्हाण यांनी दिली.
संघाचे विश्वस्त देवदास मटाले यांनी स्पष्ट केले की, ‘यासाठी कोणतीही नोंदणी फी आकारली जाणार नाही. ‘नाट्य शुक्रवार’ हा एक प्रकारे सांस्कृतिक लोकचळवळीचा आरंभ असून, पुढील काही महिन्यांत या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याचाही मानस मटाले यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाने सुरु केलेला हा नाट्यशुक्रवार उपक्रम स्तृत्य असून महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांसाठी पथदर्शि असल्याचे रविंद्र देवधर म्हणाले. तर या नाट्यउपक्रमात मुंबईसोबतच महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील नाटयकलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे नयना रहाळकर म्हणाल्या.
या नाट्यउपक्रमात ज्यांना आपल्या कलाकृती सादर करायच्या आहेत त्यांनी देवदास मटाले (९७६९६६४४६४), रविंद्र देवधर (९४२२३४४५५५) आणि नयना रहाळकर (९३२२४९२६२९) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या उपक्रमास नाट्यरसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी केले.

error: Content is protected !!