मोनोरेल ओव्हरलोड. ३ तास मधेच थांबली. सुदैवाने ५८२ प्रवासी बचावले चौकशीचे आदेश!
मुंबई/ चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल अडकून पडल्याची घटना घडली होती. यानंतर एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी लगेच प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले होते. आता मोनो रेलचे रेस्क्यू ऑपरेशन संपले आहे. एकूण ५८२ लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. कोणतीही जीवित हानी नाही किंवा जखमी नाही.
आज भक्ती पार्क ते चेंबूर दरम्यान धावणाऱ्या मोनोरेल आर एस टी /४ मैसूर कॉलोनी स्टेशन दरम्यान मोनो बंद पडली. प्राथमिक तपासणीत असे आढळून आले की, क्षमतेपेक्षा अधिक गर्दीमुळे मोनोरेलचे एकूण वजन सुमारे १०९ मेट्रिक टनांपर्यंत वाढले, जे तिच्या मूळ क्षमतेपेक्षा अधिक होते. मोनोची एकूण क्षमता १०४ टन आहे. या जास्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला, ज्यामुळे मोनोरेलसाठी अत्यावश्यक असलेला वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मोनो बंद पडली.
मोनोरेल बंद पडल्यानंतर एमएमआरडीएने लगेचच टेक्निशीयन ची टीम घटनास्थळी रवाना केली. मोनो एस ओ पीनुसार लगेच दुसरी मोनोही तिथे रवाना केली. आपत्कालीन परिस्थितीत दुसऱ्या मोनोमार्फत टो करून किंवा खेचून स्टेशन पर्यंत आणल जात. पण क्षमतेपेक्षा वजन जास्त असल्याने मोनो खेचून स्टेशनपर्यंत आणता आली नाही आणि त्यामुळे अग्निशमन विभागामार्फत हे रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं.
आजच्या अतिवृष्टीमुळं भारतीय रेल्वेच्या हार्बर लाईनवरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मोनोरेल स्थानकांवर झाली. सुरक्षा यंत्रणांनी वारंवार आवाहन करूनही अनियंत्रित गर्दी टाळता आली नाही, कारण प्रवासी संख्या अत्यंत वाढली होती. हे अधोरेखित करणे अत्यावश्यक आहे की, मुंबई मोनोरेल ही मर्यादित क्षमतेची सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे, जी विशिष्ट मार्गांसाठी रचित असून, पारंपरिक लोकल किंवा मेट्रोसारख्या उच्च क्षमतेच्या तात्काळ गर्दीचे वहन करण्यासाठी डिझाइन केलेली नाही.
एमएमआरडीए आपल्या मेट्रो व मोनोरेल प्रणालीमार्फत सुरक्षित व सुगम प्रवास सुनिश्चित करण्यास वचनबद्ध आहे. आजची घटना ही मुख्यतः अनियंत्रित गर्दीमुळे घडली असून, अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी सुरक्षा व तांत्रिक पथकांच्या सूचनांचे पालन करण्याचे विनम्र आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून सेवा सुरळीतपणे चालू ठेवता येईल.
एमएमआरडीए, बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर आपत्कालीन सेवांशी समन्वय साधून प्रवाशांना मदत, सुरक्षितरीत्या बाहेर काढणे व वीज व सेवा पुनर्संचलनासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. सदर घटनेची तांत्रिक तपासणी सुरु असून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता सुधारात्मक उपाय तत्काळ राबविले जात आहेत.
