बेस्टच्या – निवडणुकीत ठाकरे ब्रँडला पराभवाचा धक्का! सर्व उमेदवार पराभूत
मुंबई /मुंबई महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून सांगितले जात असलेल्या, मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला पराभवाचा धक्का बसला.२१ पैकी १४ जागांवर शशांक राव तर ७ जागांवर भाजपच्या प्रसाद लाडच्या पॅनलचा विजय झाला.बेस्टच्या युनियन मध्ये सगळेच काही मराठी नव्हते. किंवा ही निवडणूक मुंबईतील सर्व मराठी माणसांची नव्हती, त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा पराभव झाला असे म्हणता येणार नाही.उलट सरकारी ताकतीचा सर्व वापर करून ही निवडणूक प्रतिष्ठेची करणाऱ्या भाजपला थोडेफार समाधान मानण्या इतपत यश मिळाले. अशी प्रतिक्रिया मुंबईतील मराठी माणसांनी व्यक्त केली आहे.
बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड म्हणजेच बेस्ट पतपेढीची निवडणूक यावेळी चांगली चर्चेत राहिली. कारण ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना पहिली ठाकरे बंधूंची युती बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत झाली. मात्र ही ठाकरे बंधूंची युती बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत साधा भोपळा सुद्धा फोडू शकली नाही. ठाकरे बंधूंच्या या युतीला आपला एक सुद्धा उमेदवार निवडून आणता आला नाही.तर समोर असलेल्या महायुती पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनल ने ७ जागा जिंकल्या. मात्र खऱ्या अर्थानं जर कोणी किंगमेकर ठरलं असेल तर ते बेस्ट वर्कर्स युनियन शरद राव पॅनल. शरद राव पॅनलने २१ पैकी १४ जागा जिंकत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
ठाकरे बंधूंनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर मेळावा घेतला आणि त्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचे वातावरण महाराष्ट्रात तयार झालं. आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आणि याच दरम्यान बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित निवडणूक लढण्यासाठी रिंगणात उतरले. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेनेचे १९ आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी संघटनेचे दोन असे २१ उमेदवारांचं उत्कर्ष पॅनल तयार करण्यात आलं. मागील नऊ वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेला यावेळी मनसेची साथ मिळाल्यानंतर आपण पुन्हा एकदा बाजी मारणार हा आत्मविश्वास निर्माण झाला मात्र प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालात काही वेगळच घडलं .बेस्ट पतपेढीच्या निकालात २१ उमेदवारांचा पॅनल होतं. यामध्ये ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या कामगार सेनांची युती असलेलं उत्कर्ष पॅनल होतं. बेस्ट कामगार सेना ( ठाकरेंची शिवसेना संघटना) यांचे १९ तर मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना ( मनसे संघटना) यांचे २ उमेदवार रिंगणात होते.
सहकार समृद्धी पॅनलमध्ये एकूण २१ उमेदवार होते. यामध्ये श्रमिक उत्कर्ष सभा ( भाजप प्रणित संघटना ) यांचे ८, समर्थ बेस्ट कामगार संघटना ( नितेश राणे यांची भाजप प्रणित संघटना ) यांचे ५,राष्ट्रीय कर्मचारी सेना ( शिंदे शिवसेना प्रणित संघटना ) यांचे ४, एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन यांचे ३ आणि दि इलेक्ट्रिक यूनियनचा एक उमेदवार रिंगणात होता. दि बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांक राव पॅनल कडून २१ उमेदवार उभे होते. शरद राव पॅनलने २१ पैकी १४ जागा जिंकल्या तर प्रसाद लाड यांच्या पॅनलनं ७ जागांवर विजय मिळवला.
खरेतर ठाकरे बंधूंचे उत्कर्ष पॅनल जिंकणार, की मग महायुती पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनल जिंकणार यामध्ये लढतीची चर्चा असताना, मात्र निकालात शशांक राव पॅनलने बाजी मारली. बेस्ट वर्कर्स यूनियन शशांक राव पॅनलचे १४ उमेदवार विजयी झाले. सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले. यामध्ये भाजप पुरस्कृत श्रमिक उत्कर्ष सभेचे ४ उमेदवार विजयी झाले. शिंदेंची शिवसेना पुरस्कृत राष्ट्रीय कर्मचारी सेना २ उमेदवार तर एससी एसटी वेल्फेअर युनियनचा 1 उमेदवार विजयी झाला. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी आमच्यासाठी युद्ध अजून संपलेले नाही. अशी प्रतिक्रिया मनसेकडून व्यक्त करण्यात आली.तर सरकारी ताकतीचा वापर करून ही निवडणूक जिंकण्यात आली. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे.
