ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या वैभवशाली क्रीडा इतिहासात-क्रीडा पत्रकारांसाठी मानाचे पान – धनराज पिल्ले

मुंबई : महाराष्ट्रातील क्रीडा वैभवाची गाथा लिहायची असेल तर त्यात क्रीडा पत्रकारांनाही मानाचे पान असले पाहिजे. उद्या जर याची डॉक्युमेंटरी करायची झालीच तर आम्हा खेळाडूंना या पत्रकारांबद्दल बोलायला सांगा. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा क्रीडा पत्रकार हा अविभाज्य भाग आहे, अशा शब्दात पद्मश्री हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कारप्राप्त विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर धनराज पिल्लेचे नाव आज जे गाजतेय त्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातील क्रीडा पत्रकारांनी घातली. १८ वर्षांच्या माझ्यासारख्या युवा हॉकीपटूतील गुण हेरून वर्तमानपत्रात त्याची हेडलाईन बनविणारे हे सगळे माझे पत्रकार मित्रच होते. माझी आई आजही वर्तमानपत्रातील बातमीची कात्रणे जपून ठेवते. तुमचे हे प्रेम मी कसे विसरू शकतो, असेही धनराज पिल्ले यावेळी म्हणाले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या क्रीडा पत्रकार पुरस्कार सोहळ्यावेळी ते बोलत होते. माझ्या विजयाची एक पत्रकार परिषद स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर घेतली होती. यावेळी दुसर्‍या दिवशी सर्व वृत्तपत्रात जी आलेली हेडलाईन ‘धनराज पिल्ले यांना ४८ तासात मुंबईत घर’ होती ती खूप मला भावली. अशा अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.

मुंबई मराठी क्रीडा पत्रकार संघा तर्फे कै. आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार, तुषार वैती (२०२१), प्रसाद लाड (२०२२), जयेंद्र लोंढे (२०२३), रोहित नाईक (२०२४) यांना प्रदान करण्यात आला. ७ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

तसेच ज्येष्ठ क्रीडा पत्रकारांसाठी कै. महेश बोभाटे क्रीडा पत्रकार पुरस्कार, द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर देण्यात आला होता. २०२० सालचा हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव सनीलने स्वीकारला. तर शरद कद्रेकर (२०२१), संजय परब (२०२२), विजय साळवी (२०२३), सुभाष हरचेकर (२०२४) यांना कै. महेश बोभाटे पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी कै. आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कारासाठी आर्थिक सहाय्य करणारे आत्माराम मोरे यांचे चिरंजीव अश्विनीकुमार आणि कै. महेश बोभाटे पुरस्कारासाठी मदत करणारे त्यांचे चिरंजीव प्रथमेश बोभाटे यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार विजेते संजय परब यांनी त्यांना मिळालेला दहा हजाराचा धनादेश प्रभाकर नारकर यांच्या कोकण विकास समिती या संस्थेला दिला. तर क्रीडा पत्रकारांसाठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन अभ्यासक्रम सुरू केला तर मी त्यात योगदान द्यायला तयार आहे, असे विजय साळवी यांनी नमूद केले.

सोहळ्याचे अतिथी ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे म्हणाले, आम्ही खेळ खेळत होतो मात्र बातमीतून लिखाणातून हे पत्रकार आमच्या मनातले लिहित होते, ही खूप मोठी गोष्ट आहे. खेळाडू घडविण्यात मराठी क्रीडा पत्रकारांचे योगदान मोठे होते.

महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया कबड्डीपटू विजू पेणकर म्हणाले की, ज्या माणसाचा मी चाहता आहे त्याच्या मांडीला मांडी लावून हा सोहळा पाहतोय, खूप भाग्याची गोष्ट आहे. त्याच्यावर अन्याय झाला खरा मात्र त्याने जगाला दाखवले की अन्याय सहन करणारा किती मोठा होऊ शकतो. पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्याने जे टीम वर्क करून जो विजय मिळवला आहे त्याला तोड नाही. पत्रकार संघाला चांगला कॅप्टन मिळाला आहे, असे ते म्हणाले.

पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, माझ्या ३० वर्षांच्या क्रीडा पत्रकारितेतील सर्व आठवणी आज जाग्या झाल्या. आजचा हा सोहळा म्हणजे क्रीडा क्षेत्रातील गेट टूगेदर म्हणावे लागेल. सोहळ्यास आलेले काहीजण १० ते १५ वर्षांनंतर भेटत आहेत. कोरोनानंतर दोन-तीन वर्ष घडी बसायला वेळ लागला असल्याने पुरस्कार देण्यास विलंब झाला. धनराज पिल्ले यांचे कर्तृत्व भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. धनराज यांनी त्याच्या संघसहकार्‍यांसाठी विमानतळावर हॉकी खेळाडूंसाठी आंदोलन केले होते. त्या आंदोलनामुळेच आज क्रिकेट सोडून इतर खेळातील खेळाडूंनाही विमानाने पाठविले जाते. यंदा खेलो इंडियासाठी महाराष्ट्राच्या ५६५ खेळाडूंचे पथक बिहारला विमानाने पाठविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते, याचे श्रेय धनराजचेच असल्याचे चव्हाण म्हणाले.

संघाचे कार्यवाह व पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार समिती उपाध्यक्ष व संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री उदय देशपांडे, रोहित शर्माचे कोच पद्मश्री दिनेश लाड, अनेक क्रीडा संघटक, पत्रकार संघाचे विश्वस्त देवदास मटाले, सुरेश वडवलकर, प्रा. हेमंत सामंत, दिवाकर शेजवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. सोहळ्याचे निवेदन अश्विन बापट यांनी तर आभार प्रदर्शन स्वाती घोसाळकर यांनी केले.

फोटो ओळी

मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्काप्राप्त क्रीडा पत्रकार. सोबत पद्मश्री धनराज पिल्ले, ग्रँडमास्टर प्रविण ठिपसे, मिस्टर इंडिया विजू पेणकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर आणि विश्वस्त देवदास मटाले.

error: Content is protected !!