शेअर मार्केट ट्रेडिंग फ्रॉड प्रकरणात चौघांना अटक
मुंबई : ऑनलाईन जुगार, डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटिंग असे एक ना अनेक प्रलोभने दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली असून आर्थिक फसवणूक केल्याचे बहुतांश गुन्हे आहेत. आता, पुन्हा एकदा ऑनलाईन शेअर मार्केटच्या माध्यमातून जादा नफा देण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ४ जणांना बंगरूळू सायबर पोलिसांनी अटक केली आहे. ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड विरोधात मुंबई सायबर कक्षाची ही मोठी कारवाई मानली जात आहे.
बंगळुरूच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या चार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. डिजिटल मार्केटिंग कंपनी “व्हॅल्यू लिफ”च्या अधिकाऱ्यांनी सायबर फ्रॉडमध्ये गुंतलेल्या हाँग काँगच्या कंपनीला मदत केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. डिजिटल अरेस्ट प्रकरणानंतर आता ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड विरोधात अशा पद्धतीची पहिलीच कारवाई असल्याचे समजते.
व्हॅल्यू लिफ कंपनीच्या उपाध्यक्ष (सेल्स) आणि अकाउंट्स हेड यांच्यासह एकूण चौघांना अटक करण्यात आली आहे. हाँग काँगच्या फर्स्ट ब्रीज कंपनीने फेसबुकवर जुलै महिन्यात देशात ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉडच कॅम्पेग्न चालवलं होत. या कॅम्पेन दरम्यान अर्थ तज्ज्ञांचे डीप फेक व्हिडिओ बनवून अनेकांना शेअर ट्रेडिंग फ्रॉडमध्ये पैसे गुंतवण्यात उद्युक्त करण्यात आलं होतं. यां कॅम्पेनसाठी व्हॅल्यू लिफ कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा वापर झाल्याचा आरोप आहे. कॅम्पेन दरम्यान व्हॅल्यू लिफची अनेक खाती फेसबुकची पेरेंट कंपनी मेटाने येल्लो फ्लॅग देखील केली होती. मात्र, त्यानंतरही कॅम्पेन सुरूच ठेवल्याचा आरोप कंपनीवर आहे, त्यातूनच बंगरुळू सायबर विभागाने कारवाई करत कंपनीच्या ४ उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे.