अल्लाने पाकची शेपटी सरळ करावी अन्यथा आम्हाला करावी लागेल- ओवेसी
पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक असे डिझाईन तयार केले की, त्यामुळे देशात दोन समाजात, धर्मात तणाव वाढेल. त्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यांना कलमा वाचायला लावला. ज्यांनी स्वतःला हिंदू सांगितले. ज्यांना कलमा वाचता आला नाही. त्यांना वेगळे करून गोळ्यांनी ठार करण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना प्राण गमवावे लागले. पण पाकिस्तानचा हा कट भारताने यशस्वी होऊ दिला नाही, असे वक्तव्य खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले. त्यांनी पाकिस्तानवर टीका केली. शुक्रवारी हैदराबाद येथील हज हाऊसमध्ये त्यांनी हज यात्रेकरूंशी संवाद साधला. त्यावेळी पाकच्या नापाक कटाची माहिती देत त्यांनी मोठे विधान केले.
हज यात्रेकरूंशी बोलताना त्यांनी पाकड्यांना जबरदस्त संदेश दिला. त्यांनी हज यात्रेकरूंना मोठे आवाहन केले. आपला शेजारी सुधारणारा नाही, प्रार्थना करा, अल्लाहने त्याची शेपटी सरळ करावी, नाहीतर वेळ येईल तेव्हा त्यांची ही शेपटी सरळ करावी लागेल, असे ते म्हणाले. ही यात्रा धैर्य, कृतज्ञता आणि विनम्रतेने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. ही यात्रेकरूंची आध्यात्मिक परीक्षा असल्याचे ओवेसी म्हणाले. धैर्य, त्याग आणि बंधुभावाच्या गुणांचा अभ्यास करावा असे ते म्हणाले
