मुंबईत ३० वर्ष गुरुमाऊली बनून राहणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाला अटक
मुंबई/अवैधरित्या भारतात राहणार्या बांगलादेशींविरोधात सुरक्षा यंत्रणांनी कठोर पावले उचलली आहेत. घुसखोरी करुन भारतात राहणाऱ्या हजारो बांगलादेशींना आतापर्यंत हद्दपार करण्यात आलं आहे. मात्र काही बांगलादेशींकडे आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी भारतीय कागदपत्रे असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. असं असले तरी मुंबई पोलिसांनी अशा घुसरोखोरांना शोधून काढलं आहे. मुंबई पोलिसांनी एका बांगलादेशी तृतीयपंथीयाला अटक केली असून, ती गेल्या ३० वर्षांपासून भारतात बनावट कागदपत्रांच्या आधारे राहत असल्याचे समोर आले
मुंबईत ‘ज्योती उर्फ गुरु मां’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तृतीयपंथीयाचे खरे नाव बाबू अयान खान असल्याचे उघड झाले आहे. गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरू केली होती. याच दरम्यान ज्योतीचे काही साथीदार पकडले गेले होते. सुरुवातीला ज्योतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते, पण तेव्हा तिच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्डसह सर्व भारतीय कागदपत्रे असल्याने तिला सोडून देण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या कागदपत्रांची कसून चौकशी केली. तेव्हा ते सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे समोर झाले. त्यानंतर तिला पुन्हा अटक करण्यात आली.
बाबू अयान खान उर्फ ‘ज्योती’कडे मुंबईतील रफीक नगर आणि गोवंडीसह विविध भागांत २० हून अधिक मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या मालमत्तांची किंमत खूप मोठी असण्याची शक्यता आहे. या भागांत तिचे अनेक अनुयायी आहेत, जे तिला ‘गुरु मां’ म्हणून मानत होते. मुंबईतील शिवाजी नगर, नारपोली, देवनार, ट्रॉम्बे आणि कुर्ला अशा अनेक पोलीस ठाण्यांमध्ये ‘ज्योती’वर गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी ज्योतीला पारपत्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली अटक केली आहे मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहणाऱ्या अवैध नागरिकांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
