शिक्षकदिनी मुस्लिम शिक्षकाचा सत्कार केल्याने वाद!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद आणि खाजगी हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी मानेगाव येथील विठ्ठल मंदिरात विविध शिक्षकांचा सत्कार करण्यात आला होता. गावातील शिक्षक शौकत बाशु शेख यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी “मुस्लीम आहेस, गोमांस खाणाऱ्याना मंदिरात कसे काय बोलावले?”, असा जाब विचारत गावातील परमेश्वर नागनाथ राऊत याने गोंधळ घातला. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केले. गावातील अल्पसंख्याक समाजातील इतर ग्रामस्थांनी एकत्रित येत याबाबत राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार केली. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे वसीम बुऱ्हाण यांनी ताबडतोब पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले होते. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार माढा पोलीस ठाण्यामध्ये संबंधित इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहाजान फतरु कोरबू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मानेगावामध्ये ३०० ते ४०० मुस्लिम समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. मानेगाव येथील परमेश्वर नागनाथ राऊत हा नेहमी अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना पाहुन हे लोक मटन खातात. तसेच त्यांना बोलत जाऊ नका असे म्हणून शिवीगाळ करत होता. मानेगाव येथील शिक्षक सुशील आंनद पारडे यांनी ५ सप्टेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गावातील विठ्ठल मंदीरामध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाकरिता गावातील सर्व शिक्षक तसेच अल्पसंख्याक समाजातील नागरिक कार्यक्रमाला हजर होते.