[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ऑपरेशन सिंदूरच्यावेळी काँग्रेस पाकिस्तान सोबत होती – मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल


गुहाटी/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ सप्टेंबर) आसाममध्ये १९००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींसोबत उभी राहते आणि घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी काम करते.’
पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा दहशतवादी घटनांमुळे देश रक्तबंबाळ होत होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या पाठीशी उभी होती. पाकिस्तानचे खोटे बोलणे काँग्रेसचा अजेंडा बनले. काँग्रेसने व्होट बँकेच्या राजकारणासाठी नियोजनबद्ध पद्धतीने घुसखोरीस प्राधान्य दिले. आसाम सरकारने लाखो एकर जमीन घुसखोरांपासून मुक्त केली,’ असा दावाही त्यांनी केला.
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर आसामच्या महान कलाकार भूपेन हजारिका यांचा अपमान केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, ‘काँग्रेस अध्यक्षांनी भारतरत्न पुरस्काराची खिल्ली उडवत म्हटले होते की, मोदी नर्तक आणि गायकांना भारतरत्न देत आहेत. काँग्रेसने आसामच्या सुपुत्राचा अपमान केला, ही अतिशय दुखावणारी बाब आहे. काँग्रेस अहंकाराने भरलेली आहे. आसामच्या लोकांनी, देशातील लोकांनी भूपेन दा यांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसला जाब विचारला पाहिजे. आसामच्या सांस्कृतिक वारशाचा आदर, आसामचा जलद विकास ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे.
यावेळ पंतप्रधानांनी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘तुम्ही जे काही खरेदी कराल, ते स्वदेशीच खरेदी करा. तुम्ही एखाद्याला भेटवस्तू दिली, तर ती मेड इन इंडिया असावी. त्यात भारतीय मातीचा सुगंध असावा. कंपनी कोणत्याही देशाची असो, ती वस्तू भारतात बनवलेली असली पाहिजे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटीचे दर कमी केले जातील. आरोग्य, विमा, सर्व काही स्वस्त होईल. जीएसटीच्या निर्णयामुळे सणांमध्ये चमक वाढेल असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!