[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शरद पवारां सोबत पुन्हा स्वगृही जाणार का ?


नो कॉमेंट्स ! अजित पवारांचे एका वाक्यात उत्तर
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू राजकीय घडामोडीना वेग येत आहे. सर्वच पक्षांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही जोरदार सुरू आहेत.
तर अनेक जण पक्ष बदल करून स्वत:साठी आगामी रणनीतीही आखत आहेत. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही राज्यात आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.
या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले आहेत. ही शेवटी लोकशाही आहे. पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातील कार्यकर्ते जी मागणी करतील ते आम्ही करायला तयार आहोत.असं ते म्हणाले आहेत. याशिवाय एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. तसेच, शरद पवारांकडून तुमच्यासाठी दरवाजा उघडा ठेवण्यात आला आहे, असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर अजित पवारांनी एकाच शब्दांत उत्तर देत विषय संपवल्याचे दिसून आले.
मुलाखतीत विचारण्यात आलेल्या, तुमचीही यात्रा सुरू आहे, तशी शरद पवारांचीही यात्रा सुरू आहे. दोघांमध्ये खूप जोरात स्पर्धा सुरू आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, नाही स्पर्धा नाही. ते, जयंत पाटील, अमोल कोल्हे हे सर्वजण मिळून त्यांना जे वाटतंय, तसं ते करत आहेत. कारण, आम्ही तर खूप वर्ष तिथं काम केलं आहे. तो पक्ष जसा सुरू झाला तेव्हापासून मी त्यात होतो. तेव्हापासून मला सगळं माहीत आहे. ते आता त्यांच्या हिशोबाने पुढे जात आहेत, मी माझ्या हिशोबाने पुढे जात आहे. शेवटी निर्णय घेणं तर मतदारांचं काम आहे.
यानंतर शरद पवारांना विचारलं गेलं होतं, की अजित पवार परत येतील का? तर त्यांनी म्हटलं होतं की पक्ष ठरवेल. अशावेळी तुम्हाला वाटतं का त्यांच्याकडून ते निमंत्रण देत नाहीत परंतु दरवाजा उघडा आहे? असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा यावर अजित पवारांनी ‘नो कॉमेंट्स’ म्हणत एकाच शब्दांत विषय संपवला.

error: Content is protected !!