आज सर्व विरोधी पक्षांचा निवडणूक आयोगाच्या कार्याल्यावर महामोर्चा
नवी दिल्ली/विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर मत चोरीचे गंभीर आरोप केले. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार सोमवारी संसद भवनापासून राजधानी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) द्वारे कथित ‘मत चोरी’ विरोधात विरोधी पक्षाचे खासदार निषेध काढणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह ३०० लोकसभा आणि राज्यसभा खासदार या मोर्चात सहभागी होणार आहेत.
खासदारांसाठी रात्रीच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांना रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण दिले आहे. या मोर्चात राजद, तृणमूल, द्रमुकसह २५ हून अधिक पक्ष सहभागी होणार आहेत. खासदार सकाळी ११.३० वाजता संसद भवनाच्या मकर द्वार येथून वाहतूक भवनमार्गे मार्च काढणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर सतत हल्लाबोल करत आहेत. त्यांनी आता एक वेब पोर्टल सुरू केले आहे. पोर्टलद्वारे लोक डिजिटल मतदार यादीच्या मागणीला पाठिंबा देऊ शकतात.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर मत चोरीचे गंभीर आरोप केले. या आरोपानंतर काँग्रेसने पुन्हा एक मोठा दावा केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील मतदार यादीतील कथित अनियमितता उघड करण्यासाठी ऑडिट सुरू करणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी रविवारी दिली. “४८ मतदारसंघ असे होते तिथे ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार ५०,००० पेक्षा कमी मतांनी पराभूत झाले आणि पक्ष त्या सर्वांची चौकशी करणार आहे, असेही वेणुगोपाल म्हणाले.
यावेळी वेणुगोपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या जनादेशाने पदभार स्वीकारला नाही असा आरोप केला. राहुल गांधी यांनी निवडणूक घोटाळ्याचे पुरावे जाहीर केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे असा दावा त्यांनी केला. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेल्या मतदार यादीतील कथित अनियमिततेवर गांधी यांनी काही स्फोटक खुलासे केले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत मतदार यादीत फेरफार करून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला असा आरोप त्यांनी केला आहे. योग्य चौकशी झाल्यास मोदींना राजीनामा द्यावा लागू शकतो, असे ते म्हणाले
