ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक कृत्रिम तलावांची उभारणी


  महानगरपालिका आणि मुंबईतील गणेश समन्‍वय समितीची संयुक्‍त बैठक परळ येथील ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीत  मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, समन्वय समिती सदस्य,  पदाधिकाऱयांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या सूचना समजून घेतल्यानंतर उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे   यांनी  महानगरपालिका प्रशासनाकडून यंदाच्या गणेशोत्सवाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीला  उप आयुक्‍त (पर्यावरण व वातावरणीय बदल) अविनाश काटे, ए विभागाचे सहायक आयुक्‍त  जयदीप मोरे, बी विभागाचे  सहायक आयुक्‍त  नितीन शुक्‍ला, डी विभागाचे  सहायक आयुक्‍त  मनीष वळंजू, ‘एफ दक्षिण’ विभागाचे सहायक आयुक्‍त  महेश पाटील, जी उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त  विनायक विसपुते,  पी उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त कुंदन वळवी, एस  विभागाच्‍या सहायक आयुक्‍त अलका ससाणे, आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या प्रमुख अधिकारी रश्‍मी लोखंडे यांच्‍यासह अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे  गणेश उत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी, मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, समन्वय समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.  

 सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती सदस्यांनी गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तसेच इतर समस्या त्वरित मार्गी लावाव्यात, अशी मागणी केली. विसर्जन मार्गावर असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करावी, मंडळांच्या मंडपाजवळ असलेला कचरा उचलून तेथे उत्सव कालावधीत निर्माल्य कलश ठेवावा, महिला भाविकांसाठी प्रसाधनगृहांची, हिरकणी कक्षाची व्यवस्था करावी, उत्सव कालावधीत खाद्यपदार्थ, मावा, मिठाई आदींमध्ये होणारी भेसळ रोखावी, सार्वजनिक मंडळांना कृत्रिम तलाव निर्माण करण्याबाबत सुविधा द्याव्यात, लोंबकळणाऱया केबल्स सुस्थितीत कराव्यात, आगमन आणि विसर्जन मार्गावरील सिग्नलच्या खांबांची उंची वाढवावी, आदी मागण्या केल्या. या सर्व मागण्या यथोचितरित्या मार्गी लावल्या जातील, असे मंडळांना आश्वासित करण्यात आले.    
उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे म्हणाले,    महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील गणेशोत्सवाचे गत वर्षी  एकूण २०४ कृत्रिम तलाव उभारून पर्यावरणपूरक उत्सवाला हातभार लावला होता. यावर्षी देखील त्याच धर्तीवर अधिकाधिक कृत्रिम तलाव उभारून मुंबईकरांसाठी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबईकरांनी देखील गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावात करून पर्यावरणपूरक उत्सवाला हातभार लावावा,  माननीय उच्‍च न्‍यायालय आणि महाराष्‍ट्र शासन यांच्‍या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक श्रीगणेशात्‍सव करिता नियोजन करण्‍यात येत आहे. श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिकेकडून नागरी सेवा-सुविधा पुरविण्याची कार्यवाही केली जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा पुरविल्या जात आहेत. 
पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव प्रयत्नांना अधिक बळकटी यावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना मोफत शाडू माती, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर मूर्ती घडविण्यासाठी मंडपाकरीता विनामूल्य जागा अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांमध्ये भर घालत यंदाच्या श्री गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना महानगरपालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक रंग पुरवठा करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनविलेल्‍या घरगुती मूर्तींचे तसेच ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्‍या इतर सर्व मूर्ती केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित करण्‍यात येणार आहेत. तसेच, कृत्रिम तलावामध्‍ये विसर्जन पश्चात जमा झालेल्‍या गाळाची साठवण पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाणार आहे. त्‍याचा उपयोग पुनर्वापर व पुनर्निमितीसाठी करण्‍यात येणार आहे. याबाबत आवश्‍यक देखरेख व संनियंत्रण महानगरपालिकेमार्फत करण्‍यात येणार असल्याची माहिती सपकाळे यांनी दिली.

error: Content is protected !!