इंडिया आघाडीची दिल्लीत डिनर डिप्लिमेसी
नवी दिल्ली/राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे हेही असणार आहेत. हे दोन्ही नेते राहुल गांधी यांची वैयक्तिक भेटही घेणार आहेत. राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं आहे, त्यासाठी आम्ही दिल्लीला जात आहोत अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 7 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यात दोघांमध्ये बैठकीच्या रणनीतीवर आणि संभाव्य विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत, त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.इंडिया आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यात जागावाटपाचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. त्याच बरोबर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याबरोबर आगामी निवडणूकीत भाजपविरोधी वातावरण तयार करण्यासाठी काय करावे लागेल याबाबतही चर्चा होणे अपेक्षित आहे.
