अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न शिंदेंचा पक्ष लावणार
मुंबई/अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न आम्ही लावून देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात केली
मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. तसेच मी लोकांसाठी काम करणारा माणूस आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रिपदी असताना कोणकोणती कामे केली, याचीही माहिती दिली. आपल्या भाषणात त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, अशा सूचना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच आपल्या भाषणात त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक भार कमी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाल आहे. आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांची पूर्ण ताकदीने मदत करणार आहोत, असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी शिवसेना पक्षातर्फेही एक मोठी घोषणा केली. अतिवृष्टीग्रस्त कुटुंबात ज्या मुला-मुलींची लग्न ठरलेली असतील ती लग्न आम्ही शिवसेना पक्षातर्फे लावून देऊ, असे शिंदे यांनी भाषणात जाहीर केले आहे. ही घोषणा करताना “मराठवाड्यात, विदर्भात अतिवृष्टीचं मोठं संकट आलं. अनेकांच्या आयुष्यात संकट आले आहे. यात अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. या अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुला-मुलींची लग्नं ठरली असतील त्या सर्वांची लग्न लावून देण्याची जबाबदारी शिवसेना घेत आहे,” अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसेच या लग्नांची पूर्ण जबाबदारी शिवसेनेची आहे. बांधिकलकी म्हणून मी जबाबदारी घेत आहे. माझ्याकडे दोन हात आहेत. माझे हे हात रिकाम नाहीत, असेही मत शिंदे यांनी व्यक्त केले.
