मालेगाव बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपी निर्दोष
मालेगाव/ मुंबईतील रेल्वे बॉम्ब स्फोटातील ११ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने याच महिन्यात निर्दोष मुक्त केले होते.त्याच्या काही दिवसातच संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील सातही आरोपींची विशेष न्यायालयाने सबळ पुरावे अभावी १७ वर्षांनी निर्दोष मुक्तता केली.मात्र हा निकाल देताना न्यायालयाने तपास व्यवस्थित झाला नाही अशी टिप्पणी करीत, तपास यंत्रणांवर कडक ताशेरे ओढले आहेत. एकाच महिन्यात दोन मोठ्या बॉम्बस्फोट खटल्यात तपास यंत्रणांच्या अपयशामुळे आरोपी निर्दोष सुटल्याने, एनआयए व एटीएस सारख्या तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास १७ वर्षे पूर्ण होत आहेत. भिक्खू चौकात घडलेल्या या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. या प्रकरणाचा निकाल तब्बल १७ वर्षांनंतर 31 जुलै मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी एनआयएने केली होती. त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. आता या प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, मेजर रमेश शिवाजी उपाध्ये, समीर शरद कुलकर्णी, अजय एकनाथ राहिरकर, प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर उदयभान धर द्विवेदी, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली.
- २००८ मध्ये मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात आज न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. जवळपास १७ वर्षांनंतर आलेल्या या निकालानंतर कोर्टात सर्व आरोपी भावूक झाले. समीर कुलकर्णी यांना निकाल ऐकवताच अश्रू अनावर झाले. “१७ वर्ष आम्ही आरोपी नव्हे, तर पिडीत होतो. आज आमचा पुनर्जन्म झाला,” असे ते म्हणाले. कोर्टात आरोपींच्या पिंजऱ्यात बसलेले इतर सहा आरोपीही अत्यंत भावनिक झाले होते. त्यांनी एकमेकांना मिठी मारत, हात हातात घेऊन भावना व्यक्त केल्या.
- बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं. पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने सांगितलं. तपासात अनेक त्रुटी होत्या. या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आले. पंचनामा योग्य नव्हता. जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही, असं निरिक्षणही न्यायालयाने नोंदवलं. चेसीस नंबर दुचाकीचा देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही, असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेचे दाव्यांवर न्यायालयाचं समाधान झालं नाही. आधी लावलेला मोक्कानंतर मागे घेतल्याने याअंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचं न्यायालयाने सांगितलं. यू ए पी ए साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे. त्यामुळे यू ए पी ए लागू होत नाही. लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवरदेखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आले. आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही, असंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचे न्यायालयाने सांगितले.
मालेगावात जल्लोष सुरु असतानाच फटाके फोडण्यावरून हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला फटाके फोडू द्या. आनंदाचा दिवस आहे, असे विनंती पोलिसांनी केली. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांचा विरोध डावलून पोलिसांकडून फटाके फोडले तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना देण्यात आला. मात्र, कार्यकर्ते फटाके फोडण्यावर ठामच राहिले. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरीही चालेल. पण, फटाके फोडणारच अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. तर फटाक्यांची लड फोडत असताना पोलीसांनी फटाके जप्त केले. तर कार्यकर्त्यांनी लडीचे तुकडे-तुकडे करत आतषबाजी करून जल्लोष केला.
